- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ अंतर्गत विभागीय कार्यशाळा

विभागात ४१ हजार ५०० हेक्टरवर सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट ; ८३० शेतकरी गट तर ८३ शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणार

नागपूर  समाचार : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा च्यावतीने (आत्मा) वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात नुकतेच विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नागपूर विभागामध्ये ४१ हजार ५०० हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी ८३० शेतकरी गट आणि ८३ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार आहेत.

या योजनेअंतर्गत १०८३.२९ कोटींची तरतूद आहे. नागपूर विभागात ४१ हजार ५०० हेक्टरवर शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्यामार्फत सेंद्रिय शेती पद्धती विकसित करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेस डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, अकोलाचे सहसंचालक संतोष आळसे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, वाशिम येथील जय किसान शेतकरी गटाचे संशोधक संचालक डॉ.संतोष चव्हाण, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, अकोलाचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल हुशंगाबादे, विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तर दूरदृश्यप्रणालीद्वारे आत्माचे संचालक दशरथ तांबाळे उपस्थित होते.

राजेंद्र साबळे यांनी मार्गदर्शन करतांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) बाबत सविस्तर माहिती दिली. नागपूर विभागात सेंद्रिय शेतीद्वारे कृषी मालाचे उत्पादन आणि निर्यात करण्यास मोठी संधी उपलब्ध असल्याचेही सांगितले.   

क्षेत्रीय स्तरावर नैसर्गिक शेती मिशन राबविण्याबाबत दशरथ तांबाळे यांनी मार्गदर्शन केले. ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट याप्रमाणे १० गटांचा समूह तयार करुन स्वतंत्र नवीन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठा बांधावरच तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच समूह संकल्पनेद्वारे उत्पादक गटांची स्थापना करुन राज्यस्तरावर शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत १००टक्के राज्य पुरस्कृत योजनेकरिता १०८३.२९ कोटी रुपयांची तरतूद आहे. मिशन अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेकरिता केंद्र हिस्सा रु.५०२.६२कोटी व राज्य हिस्स्यापोटी रु. ३३५.०८ कोटी तरतूद आहे. असा एकूण कार्यक्रम रु. १९२०.९९ कोटीचा आहे. साधारणपणे नागपूर विभागात ४१५०० हेक्टरवर ८३० गटामार्फत सेंद्रिय शेती पद्धती विकसित करावयाची आहे.

नागपूर विभागामध्ये ८३० शेतकरी गट स्थापन करावयाचे असून ८३ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावयाची आहे. यामध्ये १ गट हा ५० हेक्टर चा राहील या माध्यमातून आपण ४१५०० हेक्टरवर सेंद्रिय शेती करावयाचे उद्दिष्ट आहे. शेतकरी गट स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र उभारली जाणार त्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कृषी विद्यापीठे व कृषि विज्ञान केंद्रांचा सहभाग असणार आहे.

संतोष आळसे यांनी योजनेचे स्वरुप, कार्यपद्धती, निधी व अनुदानाची उपलब्धता याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. संतोष चव्हाण यांनी शेतबांधावरील प्रयोगशाळा अंतर्गत सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या जैविक निविष्ठा, खत निर्मितीआदीबाबत मार्गदर्शन केले.निखिल हुशंगावादे यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण या विषयावर माहिती दिली. 

या कार्यशाळेसाठी नागपूर विभागीतील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.अर्चना कडू यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *