वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा
नागपूर समाचार : वाचनामुळे जीवन समृध्द होते, वाचन संस्कार घडवितात. तुकाराम महाराज महान साहित्यसंत होते. त्यांच्या अभंगातील प्रथम चरण नेहमी वाचावे. विद्यार्थ्यांनी अधाशासारखे साहित्य शोधून ते वाचावे. पुस्तकामुळे क्रांती घडतात, असे ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ऐ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, प्रमुख वक्ता ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य वि. स. जोग, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठी भाषा विभागाचे सहाय्यक संचालक हरिष सुर्यवंशी, तहसीलदार श्री. गायकवाड उपस्थित होते.
साहित्य इतिहासाचा दस्तऐवज आहे. व्यसनाबद्दल तिरस्कार साहित्यामुळेच निर्माण होतो. ग्रंथ हाच खरा गुरु आहे. त्याबद्दल आदर बाळगा. डॉ. कलामांचे ‘अग्नीपंख’ हे पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचावे. स्वीकार व नकार सिध्दांत अवलंबवा, असे प्रा. जोग यांनी सांगितले.
चिंतन, मनन व समीक्षण वाचनामुळे तयार होतो. बुध्दी सर्वसमावेशक होते. आजची पिढी वाचनाबाबत निरस आहे, त्यांमानाने ग्रामीण भागातील पिढीत वाचन प्रेम वाढले असतांना दिसते. सगळया प्रकारचे वाचन हीच खरी डॉ. अब्दुल कलामांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी शेवटी सांगितले.
आजच्या युगात मोबाईल व टिव्हीमुळे नागरिकांचे वाचनाकडे दुर्लक्ष झालेले आढळते. शासनाने शुध्द मराठी भाषेसाठी प्रयत्न करावेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांनी सांगितले.
प्रत्येकांनी विनोबाच्या गिताईची एकतरी प्रत आपल्याकडे ठेवावी व तिचे वाचन करावे. त्यामुळे मराठी शुध्दीकरणात भर पडेल. स्व. सावरकरांचे मराठी शुध्दीकरणात मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. शब्दाची ताकत फार मोठी आहे. त्यामुळे व्याकरणात चूक होता कामा नये. अन्यथा अर्थाचे अनर्थ होतात, हेही त्यांनी पटवून दिले. भाषा शुध्दीकरणासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ वाचावा. त्यामुळे इतिहास समजेल व भाषा शुध्द होईल, असे त्यांनी सांगितले.
मनाला पैलू पाडण्याचे काम वाचन करते, ग्रंथ हाच खरा आधार आहे. कवितेचेही वाचन करा, भाषेला नेटकेपणा येण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. त्यासाठी वाचन करा, असे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप दाते म्हणाले की, व्हॉटस्ॲपमुळे भाषेचे संदर्भ बदलत आहेत. त्यावर विचार करण्याची गरज आहे. वाचनाबद्दल विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली पाहिजे. भाषा, संस्कृती व मायबोली वाढीसाठी विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षणाबद्दल डॉ. अब्दुल कलाम यांना विशेष प्रेम होते. त्यामुळे जीवनाला दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. अलोनी यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.