जिल्हा माहिती कार्यालयातर्फे बैठकीचे आयोजन
नागपूर समाचार : जी माहिती सकाळच्या दैनिकात नसते, अशी वेगळी माहिती घेऊन वाचकांचे लक्ष वेधणारे, विविध बातम्यांसोबतच उत्तम मनोरंजन व स्थानिक समस्यांवर प्रहार करणारे सांध्य दैनिक नागपूरची खास ओळख आहे. या परंपरेतच नव्या सांध्य दैनिकांनी आपली ओळख निर्माण करावी, असा आशावाद आज सांध्य दैनिकांच्या संपादकांच्या चर्चेत व्यक्त करण्यात आला.
नागपूर जिल्ह्यातील दैनिकांच्या यशस्वी वाटचालीत नागपूर शहर व जिल्ह्यातील सांध्य दैनिकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. हाच वारसा जिल्हायातील सध्याच्या सायं दैनिकांनी सुरू ठेवण्याची गरज असल्याचा सूर हा आजच्या बैठकीत पहायला मिळाला.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यातील शासनमान्य यादीवरील दैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्ह्यातील ब व क वर्गातील सायं दैनिकांचे संपादक, प्रतिनिधी उपस्थित होते. सांध्य दैनिकाचे सध्याच्या काळातील अस्तित्व, सांध्य दैनिकांची नागपुरातील परंपरा, जाहिरातदार आणि सांध्य दैनिक, प्रशासनाच्या प्रतिमा वर्धनात सांध्य दैनिकाची भूमिका आदी विविध विषयावर यावेळी चर्चा झाली.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. मराठी व हिंदी भाषेतील सायं दैनिके जिल्ह्यातून प्रकाशित होत असतात. या दैनिकांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राखण्याची गरज आहे. शासनाच्या प्रसिद्धी संदर्भात दैनिकाची भूमिका, जाहिरात धोरण व अन्य येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे श्री. टाके यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनीही आपल्या अडचणी व समस्या यावेळी मांडल्या. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री. टाके यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती अधिकारी अतुल पांडे यांनी केले तर आभार सुनीलदत्त जांभुळे यांनी मानले.