नागपूर समाचार : जिल्ह्यामध्ये उद्भवणाऱ्या केंद्र व राज्याने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तीमुळे होणारी जीवित व वित्तहानी निवारणासाठी त्या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ठरावासह मार्गदर्शक सुचनांन्वये शासनास सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपत्ती व त्याबाबत करावयाच्या रचनात्मक तसेच अरचनात्मक उपाययोजनांची यादी विचारात घेऊन शासनाने पुरविलेल्या मार्गदर्शक सुचनानूसार उपलब्ध असलेल्या नमुन्यात माहिती भरून प्रस्ताव सादर करण्याकरीता शासनाने कळविले असून त्याप्रमाणे प्रस्ताव द्यावेत, असे ते म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेल्या आपत्ती जसे पूर, भूकंप, वीज पडणे, भूखलन, दुष्काळ, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी तसेच यामुळे होणारी हानी टाळणे व आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी संरचनात्मक तसेच असंरचनात्मक कार्यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव सादर केले.