नागपूर समाचार : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात बुधवारी (ता. ८) नागपूर महानगरपालिकेमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश देत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’च्या आकारामध्ये लावलेल्या मातीच्या ५ हजार दिव्यांनी नागपूर महानगरपालिकेचा परिसर उजळून निघाला. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दीपप्रज्वलीत करून या दीपोत्सवाची सुरूवात केली.
उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिकरित्या ५ हजार दीप प्रज्वलीत केले.
नागपूर शहरातील नागरिकांनी स्थानिक कारागिर, विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी करून ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी तसेच खरेदीसाठी जाताना घरूनच कापडी पिशवी घेउन जावी अथवा कापडी पिशवी मधूनच सामान घेउन यावे, असे आवाहन याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले. कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर वाढावा यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ मोहिमेंतर्गत इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या दालनात कापडी पिशव्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या साड्या, बेडशीट, पडदे आदी गोळा करण्यासाठी विशेष दान केंद्र सुरू करण्यात आले आहे. याशिवाय स्थानिक कलेला, कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाच्या अंतर्गत शहरातील महिलांच्या स्वयंसहायता गटांद्वारे निर्मित वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन देखील मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या दालनात लावण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांना नागरिकांनी भेट देउन पर्यावरणपूरक दिवाळीसाठी सहकार्य करावे. दिवाळीत आपण ज्या प्रमाणे आपल्या घराची स्वच्छता करतो तशीच आपल्या परिसराची आणि शहराची देखील स्वच्छता करावी, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी केले. केंद्र सरकारच्या https://pledge.mygov.in/swachh-diwali-shubh-diwali/ या संकेतस्थळावर जाउन ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ची शपथ घ्यावी व प्रमाणपत्र डाउनलोड करावे, असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘उपाय’ संस्थेला देणार दिवे
नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये प्रज्वलीत करण्यात आलेले मातीचे ५ हजार दिवे हे शहरातील स्थानिक कारागिरांकडूनच खरेदी करण्यात आले. ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मनपाद्वारे हा पुढाकार घेण्यात आला. विशेष म्हणजे, प्रज्वलीत करण्यात आलेले सर्व दिवे मनपाद्वारे ‘उपाय’ या स्वयंसेवी संस्थेला दान करण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’च्या आकारात दीप प्रज्वलीत करण्यासाठी शिक्षण विभागाच्या शेखर बनस्कर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी ४०x२४ फूट आकार जागेमध्ये दिवे लावण्यासाठी आखणी केली. त्यांच्या कार्याचे अतिरिक्त आयुक्तांनी कौतुक करीत अभिनंदन केले.