खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा परीसस्पर्श झाला की सामान्य माणसाचे सोने होते. अतिशय प्रेरणादायी, चेतनादायी, ऊर्जा देणारे व विदर्भाचा विकास साधणारे ते विकास पुरुष आहेत, असे गौरवपूर्ण उद्गार पद्मश्री परशुराम खुणे यांनी काढले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव -2023’ चे यंदा 24 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ईश्वर देशमुख कॉलेज मैदान, क्रीडा चौक, नागपूर येथे होणा-या या महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाडीपट्टीचे विनोदी कलाकार पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णाजी खोपडे, भाजपाचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, माजी महापौर कल्पना पांडे, संजय गुप्ता, यांच्यासह समितीचे पदाधिकारी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
परशुराम खुणे यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे कौतुक केले. प्रचंड गर्दीचा हा महोत्सव शिस्तीत आयोजित केला जातो. महोत्सवात सांगीतिक, अध्यात्मिक, बोधिक मेजवानी मिळते. झाडीपट्टी कलावंतांना खासदार महोत्सवात स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बंटी कुकडे म्हणाले, शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सोबत राहणारे, त्याच्या समृद्धीसाठी प्रयत्न करणारे असे खासदार नितीन गडकरी आहेत.
नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाचे चित्र बदलले. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, असे आ. कृष्णाजी खोपडे म्हणाले.
जिल्हा सरकारी वकील झाल्याबद्दल अड नितीन तेलगोटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सूत्र संचालन बाळ कुलकर्णी यांनी केले. रेणुका देशकर यांनी आभार मानले.
महोत्सवाच्या सफलतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.