रामटेक समाचार : येथील सैनिक अक्षय अशोक भिलकर (२६) यांचा कर्नाटक येथील बेळगाव येथे कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झाला. रामटेक येथील राजाजी वॉर्ड येथे राहणारे अक्षय अशोक भिलकर बेळगाव येथे मराठा रेजिमेंटमध्ये २३ जून २०१७ पासून कार्यरत होते. सोमवारी (दि. १३) ट्रेनिंगमध्ये ड्रायव्हिंग टुलिंग सेंटरच्या शिकाऊ वाहनचालकांना प्रशिक्षण देत असतानाच, शिकाऊ वाहनचालकाद्वारे वाहन मागे घेत असताना, ते अनियंत्रित झाले.
दरम्यान, अक्षय पडले आणि वाहनाच्या मागच्या चाकात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती अक्षय भिलकर रामटेकमध्ये पोहचताच, शहरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव मंगळवारी १ वाजतापर्यंत विमानाने नागपूरला आणले जाणार आहे. तेथून त्यांचे पार्थिव आर्मीच्या वाहनाने रामटेक येथे आणले जाईल. गांधी चौक येथे त्यांच्यावर पुष्पचक्र वाहण्यात येईल आणि त्यानंतर अंबाळा येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.