हाइलाइट…
- दोन सत्रात होणार विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
- 91588 80522 वर मिस कॉल द्या, नि:शुल्क ऑनलाईन पासेस मिळवा
नागपूर समाचार : दिवाळीतील लक्ष लक्ष दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघालेल्या नागपूरच्या आसमंतात आता खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे सूर निनादणार आहे. यंदाचा खासदार सांस्कृतिक महोत्सव दिवाळी संपल्यानंतर लगेच म्हणजे येत्या 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून सकाळ व संध्याकाळ अशा सत्रात होणा-या या महोत्सवात आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रोमोचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नितीन गडकरी म्हणाले, समाजामधील सर्व प्रकारच्या लोकांना खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे.
सर्वसमावेशकता, भव्यता, उत्कृष्टता आणि वैविधता हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. सर्व पिढ्यांना आवडेल असे कार्यक्रम महोत्सवात घेतले जातात. रांगोळी व किल्ले इतिहासाशी संबंधित असून पुढील वर्षी रांगोळी स्पर्धा व किल्ले स्पर्धा घेण्यात येतील, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली. मुख्य कार्यक्रमापूर्वी सायंकाळी 6 वाजता स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होतील, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सात वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे आठवे पर्व आहे. वर्षागणिक त्याचे स्वरूप भव्य होत असून त्याची ख्याती देशभरात पसरलेली आहे. इतर खासदारांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या महोत्सवात शहरवासियांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम कलाकारांच्या कलांचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. या महोत्सवाच्या तयारीला वेग आला असून हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य मंच उभारला जात आहे. त्यासाठी शेकडो कार्यकर्ते अहोरात्र राबत आहेत.
उद्घाटनाला डॉ. ज्ञानवत्सल स्वामी येणार
सलग बारा दिवसांचे भव्य आयोजन असलेल्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते, समाजसुधारक डॉ. पूज्य ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. स्वामीजींच्या उपस्थिती खासदार सांस्कृतिक महोत्सवाला आध्यात्मिक उंची प्राप्त करून देईल. त्यानंतर संस्कार भारती, नागपूर प्रस्तुत ‘महाराष्ट्र माझा’ हा 900 कलाकारांचा सहभाग असलेला महाराष्ट्राची सांस्कृतिक व लोकधारा दर्शविणारा नाट्य, नृत्य व संगीतमय आविष्कार 20 चौ. फूट इतक्या भव्य सादर केला जाईल.
अदनान सामी, मिका सिंग प्रमुख आकर्षण
गायन, वादन, नृत्य, संगीत, नाट्य अशा सर्व कलांचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात यंदा 7 आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार आहेत.’कभी तो नजर मिलाओ’ या अत्यंत लोकप्रिय गीताचे गायक, संगीतकार, अभिनेते पद्मश्री अदनान सामी, तरुणाईला वेड लावणारा ‘जब वुई मेट’ फेम पॉप सिंगर मिका सिंग व पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित गायिका श्रेया घोषाल हे यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहेत. याशिवाय, भोजपुरी सुपरस्टार अक्षरा सिंग, गोल्डन ग्लोब अवॉर्ड पटकावणा-या ‘लेट्स नाचो’ गीताचे गायक बेनी दयाल, ‘गँग ऑफ वासेपूर’ फेम गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते पियूष मिश्रा व संगीतकार जोडी सचित-परंपरा यांच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ तरुणाईला थिरकायला भाग पाडतील
भक्तीमय होणार नागपूरकर
यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात सकाळच्या सत्रात दररोज विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री हनुमान चालिसा पठण, श्री रुद्र पठण, भव्य परित्तदेशना (परित्राण पाठ), श्रीसुक्त पठण, श्री हरिपाठ पठण, श्री विष्णूसहस्त्रनाम पठण, गीता अध्याय पठण, श्री सुंदरकांड पठण, मनाचे श्लोक पठण, श्रीरामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण होणार आहे. याशिवाय, सायंकाळच्या सत्रात तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्य ‘क्रांतीनायक ‘, गजानन महाराज यांच्यावरील महानाट्य ‘ गण गणात बोते ‘, संविधान शिल्पकार महानाट्य तसेच, नृत्यस्वरूप गीतरामायण सादर केले जाणार आहे.
या महोत्सवाचा आनंद अनुभवण्यासाठी 91588 80522 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास 20 नोव्हेंबरपासून या नि:शुल्क ऑनलाईन पासेस प्राप्त करता येतील. नागपूर-विदर्भाची व मध्य भारताची शान असलेल्या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला रामटेकचे खा. कृपाल तुमाने, माजी खा. दत्ता मेघे, माजी खा. विकास महात्मे, राजे मुधोजी भोसले, उद्योगपती सत्यनारायण नुवाल, अॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. विलास डांगरे, आ. मोहन मते, आ. कृष्णाजी खोपडे, भाजपा शहराध्यक्ष बंटी कुकडे, डॉ. मिलिंद माने, संजय भेंडे यांच्यासह बी.सी. भरतीया, मोहब्बत सिंग तुली, रमेश मंत्री, महेश साधवानी, नितीन खारा, प्रफुल्ल दोशी, जयंत खडतकर, अरविंद गजभिये, गिरीश व्यास असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले. जयप्रकाश गुप्ता यांनी आभार व्यक्त केले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2023 चे वेळापत्रक
शुक्रवार, 24 नोव्हेंबर
सायं. 6.30 वाजता : स्वामीनारायण मंदिराचे डॉ. पूज्य ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन व संस्कार भारती प्रस्तुत महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा 900 कलाकारांचा सहभाग नाट्य, नृत्य व संगीतमय कार्यक्रम ‘महाराष्ट्र माझा’
शनिवार, 25 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री हनुमान चालिसा पठण
सायं. 6.30 वाजता : हरहुन्नरी गायिका श्रेया घोषाल यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
रविवार, 26 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : भव्य परित्तदेशना (परित्राण पाठ)
सायं. 6.30 वाजता : भोजपुरी सुपरस्टार अक्षरा सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
सोमवार, 27 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री रुद्र पठण
सायं. 6.30 वाजता : संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्य ‘क्रांतीनायक’
मंगळवार, 28 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्रीसुक्त पठण
सायं. 6.30 वाजता : ‘अॅन इव्हिनिंग विथ सुलतान ऑफ म्युझिक’ अदनान सामी यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
बुधवार, 29 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री हरिपाठ पठण
सायं. 6.30 वाजता : संत गजानन महाराज यांच्यावरील महानाट्य ‘गण गणात बोते’
गुरुवार, 30 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण
सायं. 6.30 वाजता : गोल्डन ग्लोब अवॉर्ड प्राप्त ‘लेट्स नाचो’ फेम बेनी दयाल यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
शुक्रवार, 1 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री विष्णूसहस्त्रनाम पठण व गीता अध्याय12/15 पठण, सायं. 6.30 वाजता : ‘गँग ऑफ वासेपूर’ फेम गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते पीयूष मिश्रा यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
शनिवार, 2 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री सुंदरकांड पठण
सायं. 6.30 वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित ‘संविधान शिल्पकार’ महानाट्य
रविवार, 3 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्रीरामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण
सायं. 6.30 वाजता : संगीतकार जोडी सचित-परंपरा यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
सोमवार, 4 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : मनाचे श्लोक पठण, सायं. 6.30 वाजता : नृत्यस्वरूप गीतरामायण
मंगळवार, 5 डिसेंबर
सायं. 6.30 वाजता : ‘जब वुई मेट’ फेम पॉप सिंगर मिका सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ व समारोप