श्री नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी समापन सोहळ्याचे उद्घाटन
नागपूर समाचार : अध्यात्म आणि विज्ञान यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यांचे गंतव्यस्थान एकच आहे. विज्ञान हे बाह्यजगाचा शोध घेते तर अध्यात्म हे अंतस्फूर्तीचा आधार आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे दोघे एकमेकांविरोधात नाही. दोघांमधील भांडण हे अहंकाराने लावलेले आहे. विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधता येत नाही आणि अध्यात्म असल्याशिवाय विज्ञान कळत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
श्री शांतिपुरुष सेवा संस्थेतर्फे श्री दत्तसंप्रदायातील परमपमूज्य परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य श्री चैतन्यानंद सरस्वती नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद (125 वर्षे) जन्मशताब्दी समापन समारोहाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी श्री शांतिपुरुष सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबामहाराज तराणेकर, कार्याध्यक्ष राजीव हिंगवे व तेजस तराणेकर यांची मंचावर उपस्थिती हेाती. डॉ. बाबामहाराज तराणेकर यांच्या हस्ते डॉ. मोहनजी भागवत व नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे मुखपत्र ‘श्री शांतिपुरुष’ च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ. मोहन भागवत यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची उत्कृष्ट सांगड घालत कार्य करणा-या त्रिपदी परिवारच्या कार्याचे कौतुक केले. आपली परंपरा सनातन असून त्यावेळच्या लोकांचा मन व बुद्धीचा स्तर आजच्या लोकांपेक्षा खूप वेगळा होता. त्याकाळी जे तत्व दर्शन झाले ते आज उलगडून दाखवण्याचे काम संतमहात्मे करत असतात. श्री दत्ताची उपासना ही गुरू उपासना आहे. सगळ्या जगाच्या गुरूसत्तेचे प्रतिक दत्त महाराज आहेत, असे ते म्हणाले. आत्मप्रकाशात अडखळलेल्या जगाला पथदर्शन करण्याचे भारताला करायचे असून आपल्या भूमीवर ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळी आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबामहाराज तराणेकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात त्रिपदी परिवाराची संकल्पना स्पष्ट केली. नानामहाराजांच्या कार्याचा आढावा घेताना नानांची यशकाळ प्रतिमा असणारा हा परिवार आहे, असे ते म्हणाले. त्रिपदी परिवार हा केवळ धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातच नाही तर स्वयंसेवी पद्धतीने कार्य करतो असे त्यांनी सांगितले.
राजीव हिंगवे यांनी प्रास्ताविकतून नानामहाराजांच्या दत्त स्रंप्रदायाच्या कार्याचा, तसेच अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुपाली बक्षी यांनी करुणा त्रिपदी सादर केली. त्यानंतर अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. दुस-या सत्रात रात्री कार्तिक कला अकादमी इंदूरतर्फे ‘अमृतस्य नर्मदा’ ही नृत्यनाटिका प्रस्तुत करण्यात आली. या कार्यक्रमाला कांचनताई गडकरी विशेषत्वाने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर गलांडे यांनी केले.
त्रिपदी परिवारचे लोकसेवा हे वैशिष्ट्य – नितीन गडकरी
अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून नवीन पिढीमध्ये व समाजामध्ये गुणात्मक परिर्वतन घडवून आणण्याचे कार्य त्रिपदी परिवार करीत आहे. लोकशिक्षण आणि लोकसंस्काराबरोबरच लोकसेवा हे देखील त्रिपदी परिवारचे वैशिष्ट्य आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
इंदोर येथे झालेल्या नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचा योग आला होता, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितले. नानामहाराजांचे लहानपणी अनेकदा दर्शन घेण्याची संधी मिळाली आहे. बाबामहाराजांनी त्यांचे कार्य यशस्वीपणे पुढे चावले आहे. विज्ञानाची जोड देऊन अध्यात्माला पुढे नेण्याचा काम बाबामहाराज करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.
आज समारोहात
मूकबधिर संस्था, शंकरनगर चौक येथे सकाळी 8.30 वाजता श्रीसद्गुरूंच्या मूर्तीस महाभिषेक. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू्. बाबामहाराज तराणेकर राहणार असून प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, सयाजी विद्यापीठ वडोदराच्या संस्कृत, पाली व प्राकृत भाषा विभागाच्या अध्यक्ष डॉ. श्वेता जेजुरीकर यांची उपस्थिती राहील. यावेळी राजेंद्र बेनोडेकर लिखित ‘मागोवा: प्राचीन भारताचा’ पुस्तकाचे विमोचन होणार आहे.