- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणाऱ्या संस्थांना संपूर्ण मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

हाइलाइट….

  • स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या सुवर्ण महोत्सवाचा शुभारंभ 
  • हृदयरोग चिकित्सा सेवा कक्षाचे लोकार्पण
  • नवीन 250 बेडचे हॉस्पीटलचा संकल्प 

नागपूर समाचार : समाजातील गरीब व गरजु रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे कार्य अविरत सुरु आहे. अशाप्रकारे निस्वार्थ सेवा पुरविणाऱ्या संस्थांना आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 

खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे हृदयरोग चिकित्सा सेवा कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, उपाध्यक्ष डॉ.पराग सराफ व संस्थेचे सर्व पदाधिकारी, खासदार कृपाल तुमाने, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिला मेंढे, शांता आक्का आदी उपस्थित होते.  

समाजातील गरीब व सामान्य जनतेला चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनची स्थापना झाली असून लोकवर्गणीतून संस्थेने सुरु केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुलभूत आवश्यक गरजांसोबत शिक्षण, आरोग्य व रोजगार महत्वाचे आहे. आरोग्यावरील वाढता खर्च सामान्यांना परवडत नसल्याने आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेसोबत राज्यात वैद्यकीय सेवा कक्षाद्वारे मदत देण्यात येत आहे. शासनाच्या या योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या संस्थांची आवश्यकता आहे. हे काम या मेडिकल मिशनद्वारे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

सेवेचे क्षेत्र महत्वाचे आहे. सेवा हे व्रत आहे. या भावनेतून संस्थेने 50 वर्षे काम केले‍ आहे. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 250 बेडचे हॉस्पीटल सुरु करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व मदतीची ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मेडिकल मिशनद्वारे सर्व सामान्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवेचा संकल्प अविरत सुरु असून सुवर्ण महोत्सवी वर्षातील नव्या संकल्पासाठी सुभेच्छा दिल्या. सेवा भावनेने गुणवत्तापुर्वक काम करणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याचे काम समाज करतो. सुवर्ण महोत्सव साजरा करतांना स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन संस्थेने सर्व सामान्यांच्या आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले त्याचप्रमाणे यापुढेही संस्थेचा सेवाभाव कमी होणार नाही. सेवाभाव म्हणून संस्था सुरु करतांना उत्पनाचा विचार न करता केवळ सेवा हाच उद्देश असणाऱ्या संस्थांची आवश्यकता असल्याची यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. 

डॉक्टर दिलीप गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 1974 पासून या आरोग्य केंद्राची सुरुवात करण्यात आले चे सांगताना मागील 50 वर्षात या सेवाभावी आरोग्य संस्थेची जडणघडण व प्रगतीची तसेच दवाखान्यातील अद्यावत उपचार यंत्रणा बाबत विस्तृत माहिती त्यांनी दिली. संस्थेच्या उभारणीसाठी नागरिकांनी केलेल्या मदतीबाबतही त्यांनी सांगितले व 250 बेडचे अद्यावत हॉस्पिटल उभारण्यासाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उपस्थितीतांचे आमचे आभार संस्थेचे सचिव नितीन पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *