- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक दुग्धव्यवसाय करावा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

हाइलाइट..….

  • बुटीबोरी येथील दुग्धप्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर समाचार : विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. दुग्धोत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना येत्या काळात राबविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनीही अधिकाधिक दुग्धोत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीसोबतच शेतीपूरक दूग्धव्यवसाय करावा, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

 मदर डेअरीच्या बुटीबोरी येथील दुग्ध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने दाभा येथील ॲग्रो व्हिजन प्रदर्शन परिसरात केंद्रीय मंत्री श्री. गडकरी आणि मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विखे पाटील बोलत होते.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेट बोर्डाचे अध्यक्ष मिनेश शाह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह कृषी व पशुसंवर्धन विभागाचे संबंधित केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, विदर्भ व मराठवाड्यातील विविध भागातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात सुमारे 53 लाख लिटर दूध उत्पादन होते. राज्याच्या तुलनेत ही सरासरी लक्षणीय आहे. 200 ते 225 मिली सरासरी पाऊस हा नगर जिल्ह्यात दरवर्षी पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांनी शेतीबरोबरच दूग्धव्यवसायाकडे पूरक व्यवसाय म्हणून लक्ष देत आपली प्रगती साधली आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांनीही दूग्धव्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे श्री. विखे पाटील म्हणाले. 

महानंदाच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. कर्मचा-यांची स्वेच्छानिवृत्ती आणि इतर आर्थिक बाबीसंदर्भात शासन स्तरावरून कार्यवाही सुरू असल्याचे श्री. विखे पाटील म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील शेतक-यांसाठी हा प्रकल्प मागासलेपणा दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. येत्या काळात या प्रकल्पातून 30 लाख लिटर दूधावर प्रक्रिया करण्यात यावी, असे श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

ॲग्रो व्हिजन प्रदर्शनाला दिली भेट

 मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाभा येथील ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महिको, पशुसंवर्धन विभाग, वारणा, ट्रेडकेअर आदी स्टॅाल्सला भेट देत माहिती जाणून घेतली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *