खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा पाचवा दिवस
नागपुर समाचार : ‘ये मेरी ही गलती हैं की, मैने बारीश पर अनेकों गाने तैयार किए। बारीश तो मेरी आशिक है, इसलिए वो मुझसे नागपुर आ गई’ असे म्हणत अदनान सामी ने रसिकांची मने जिंकून घेतली. अॅक्शन, प्रेक्षकांच्या शिट्टया आणि तबला यांची जुगलबंदीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा पाचवा दिवस ‘सामी’मय झाला.
गायक, संगीतकार, पियानोवादक, परफॉर्मर पद्मश्री अदनान सामी यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट मंगळवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. परंतु, काल रात्रीपासून अवकाळी आलेल्या पावसाने पटांगणावर पाणी साचले होते. त्यामुळे ऐनवेळी हा कार्यक्रम रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात स्थलांतरित करण्यात आला. सभागृहात कॉन्सर्टची तयारी करण्यासाठी रात्रीचे आठ वाजले. पण चार वाजतापासून प्रेक्षकांनी सभागृहाबाहेर गर्दी करायला सुरुवात केली होती. संपूर्ण सभागृह खचाखच भरले. त्यामुळे पार्किंगमध्येदेखील स्क्रीन लावण्यात आले होते. तेथेदेखील शेकडो प्रेक्षक असले होते आणि बाहेरही शेकडोनी रसिकांचा जमाव जमला होता.
प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली असतानाच अदनान सामी यांनी मंचावर प्रवेश केला आणि एकच जल्लोष झाला. पावसामुळे गारठलेल्या वातावरणात एकदम ऊर्जा संचारली. ‘ओयला ओयला’ या गाण्यावर तबला, अॅक्शन आणि शिट्यांची मैफल रंगली. ‘मै सिर्फ तेरा मेहबुबा’, ‘दिल कह रहा है, वादा करो’, ‘चैन मुझे अब आएना’, ‘कभी तो नजर मिलाओ’, ‘भिगी भिगी रातों में’, ‘सुन जरा सोणीए’ अशी एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करून नागपूरकरांची मने जिंकली. जगातील फास्टेस्ट किबोर्ड प्लेअर म्हणून ओळखल्या जाणारे अदनान सामी ने ‘सलाम-ए-ईश्क’ या गाण्यावर किबोर्ड वाजवून त्याची एक झलक सादर केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज पाचवा दिवस होता. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ सौम्या शर्मा, डीसीपी चांडक, सामाजिक कार्यकर्ता कांचन गडकरी, नितीन गुप्ता, अर्पणा अग्रवाल, अपर्णा अग्रवाल, टेकचंद सावरकर, आशुतोष श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. उत्तर काशीमधील टनेलमध्ये अडकलेल्या कामगारांना नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
निसर्गाच्या अवकृपेमुळे रसिकांची गैरसोय होऊनही त्यांनी ज्या संयमाने आणि उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली, त्यासाठी सर्वांचे खासदार सांस्कृतिक समितीच्यावतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.