हाइलाइट…
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
- श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाने वातावरण भक्तीमय झाले
नागपूर समाचार : ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर गुरुवारी गजानन भक्तांचा जनसागर लोटला. श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणात सहभागी झालेल्या भक्तांसह हजारो भक्तांनी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या 3 हजार किलोच्या खिचडीचा महाप्रसाद ग्रहण केला.
खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये ‘जागर भक्तीचा’ उपक्रमांतर्गत आज सातव्या दिवशी श्रीगजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. पारायणात हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
सुरुवातीला संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, निखिल गडकरी, अविनाश घुशे, गजानन भक्त गिरीश वराडपांडे, जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते गजानन महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय’ , ‘अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक योगिराज गजानन महाराज की जय’ असा गजानन महाराजांच्या नामाचा जागर करत अत्यंत भक्तीमय, अज्ञात्मिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायणाला प्रारंभ झाला. त्याचदरम्यान, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची खिचडी करायला सुरुवात केली. तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंबिर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी अशा सुमारे 3000 किलो साहित्याचा वापर करून खिचडी तयार करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खिचडी महाप्रसादाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ करण्यात आला. हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
श्रीरंग वराडपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावेळी नलिनी वंजारी, अतुल साळगोळे यांच्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
सामूहिकता व एकतेचा भाव – नितीन गडकरी
खासदार सांस्कृतिक महोत्सवात साहित्य, कला, संस्कृतीचा मेळ साधला जात असून त्यातून समाजात सांस्कृतिक मूल्य वृद्धींगत व्हावी, असा प्रयत्न आहे. यावर्षी ‘जागर भक्तीचा’ हा उपक्रम राबवला गेला. त्यालाही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज संत गजानन महाराजांचे पारायण आणि महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला, याचा आनंद होत आहे. यातून सामूहिकता, एकतेची भावना निर्माण होण्यास मदत झाली. विष्णू मनोहरांनी एक चांगला उपक्रम महोत्सवात केला, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.