खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा अकरावा दिवस
नागपूर समाचार : ‘आधुनिक वाल्मिकी’ असा आदरयुक्त उल्लेख ज्यांचा केला जातो ते लेखक व ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेले आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजाने अजरामर झालेले ‘गीत रामायण’ हे प्रत्येक मराठी मनावर कोरले गेले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अनमोल असे वैभव असलेल्या या गीतरामायण नृत्यस्वरूपात सादर करून शरयू नृत्यकला संस्थेच्या कलाकारांनी रसिकांना रामायण काळाची सफर घडवून आणली.
ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज अकरावा दिवस होता. आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक डॉ. बबनराव तायवाडे, चेंबर ऑफ असोसिएशनचे दीपेन अग्रवाल, उद्योगपती नितीन खारा, व्हीआयएचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, प्रेरणा कॉन्व्हेंटचे संचालक प्रवीण जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे, सहपोलिस आयुक्त संजय पाटील, अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, श्रीधरराव गाडगे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला श्याम देशपांडे व चमूने देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मीता खनगई यांनी केले. त्यानंतर शरयु नृत्यकला संस्था निर्मित ‘नृत्यस्वरूप गीतरामायण’ 40 कलाकारांनी सादर केले. सोनिया परचुरे यांच्या नृत्यनिर्देशनात व अतुल परचुरे यांच्या निवेदनाने नटलेल्या या प्रस्तुतीत गीतरामायणातील ‘राम जन्मला गं सखे’, ‘सावळा ग रामचंद्र’, ‘मार ही ताटिका रामचंद्रा’, ‘चला राघवा चला’, ‘आज मी शापमुक्त झाले. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ अशा गीतांवर कलाकारांनी नृत्य सादर केले. यात रामजन्मापासून ते रावण वधापर्यंतचे प्रसंग नृत्यस्वरूपात सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.