- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : चांद्रयान – 3’ म्‍हणजे ‘लाइफटाईम अचिव्‍हमेंट’; डॉ. माधवी ठाकरे यांनी सांग‍ितले रोमांचक अनुभव

नेत्री संमेलनाचे आज, 10 ड‍िसेंबर रोजी उद्घाटन 

नागपूर समाचार : ‘चांद्रयान-2’ चे अपयश हा खूप मोठा धक्‍का होता. पण त्‍यातून सावरत ‘चांद्रयान-3’ची तयारी सुरू केली. सर्व प्रकारच्‍या चाचण्‍या यशस्‍वी झाल्‍यामुळे ही मोहीम यशस्‍वी होणार याची सर्वांनाच खात्री होती. चांद्रयान-3 या यशस्‍वी उड्डानानंतर 23 जुलैला त्‍याचे चंद्रावर यशस्‍वी लँडींग झाले आणि एकच जल्‍लोष झाला. ‘वंदेमातरम्’, ‘भारत माता की जय’चा आम्‍ही जयघोष केला. ता क्षण माझ्यासाठी ‘लाइफटाईम अचिव्हमेंट’चा ठरला, अशा भावना मूळ नागपूरच्‍या व सध्‍या अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे कार्यरत असलेल्‍या डॉ. माधवी ठाकरे यांनी व्‍यक्‍त केल्‍या. यावेळी नेत्री संमेलनाच्‍या समन्‍वयक अॅड. पद्मा चांदेकर व श्रुती गांधी यांची उपस्‍थ‍िती होती. 

महिला समन्वय आणि संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्‍यावतीने उद्या रविवार, 10 डिसेंबर रोजी रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोज‍ित नेत्री संमेलनाच्‍या उद्घाटनासाठी डॉ. माधवी ठाकरे नागपुरात आल्‍या असता त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

डॉ. माधवी ठाकरे यांचा जन्म मूर्तिजापूर येथे झाला असून अकोला येथून बीएससी, अमरावती विद्यापीठातून एमएससी आणि पुणे विद्यापीठातून त्‍यांनी मटेर‍ियल सायन्‍समध्‍ये पीएचडी पूर्ण केली आहे. त्‍याकाळी इस्रोच्‍या लोगोचे प्रचंड आकर्षण होते. 2009 साली जेव्‍हा इस्रोकडून सायंटिफीक इंज‍िनीयर म्‍हणून ऑफर लेटर आले त्‍यावेळी आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे त्‍या म्‍हणाल्‍या. ‘चांद्रयान-3’ ला चंद्रावर ठरलेल्‍या ठिकाणी लँड‍िंग करण्‍यासाठी यानाला जे रिमोट सेन्‍सींग चार कॅमेरे लावण्‍यात आले होते ते डॉ. माधवी ठाकरे यांच्‍या चमूने तयार केले होते, हे विशेष. 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्‍हा सर्व मह‍िला वैज्ञानिकांना भेटायला आले तेव्‍हा आपल्‍या पाठीवर शाबासकीची थाप दिली असल्‍याचे वाटले होते. तो क्षण आम्‍ही केलेले परीश्रम विसरायला लावणारा होता, असे डॉ. ठाकरे म्‍हणाल्‍या. या यशात पती व मुलीचा महत्‍वाचा वाटा असे सांगताना डॉ. ठाकरे म्‍हणाल्‍या, कुटुंबाचे पाठबळ असल्‍याशिवाय मह‍िलांना यश म‍िळणे कठीण असते. 

नेत्री संमेलनाचे आज 10 डिसेंबर रोजी उद्घाटन 

महिला समन्वय आणि संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्‍यावतीने रविवार, 10 डिसेंबर रोजी रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात नेत्री संमेलनाचे सकाळी 9 वाजता उद्घाटन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्‍या हस्‍ते होत आहे. प्रमुख अतिथी म्‍हणून इस्रोच्या वैज्ञान‍िक डॉ. माधवी ठाकरे, भारतीय स्त्रीशक्तीच्‍या राष्ट्रीय उपाध्यक्षा नयना सहस्रबुद्धे यांची उपस्थित राहील. 

या संमेलनात आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सेवा, धार्मिक,कला, अभ‍ियंता, शिक्षण, सीए, विद्यार्थीनी, गृहि‍णी अशा सुमारे 1550 मह‍िला सहभागी होणार आहेत. 225 सामाज‍िक संस्‍थांनी नोंदणी केली असून 35 ते 55 वयोगटातील सुमारे 1100 मह‍िलांचा यात समावेश आहे.  

उद्घाटन सत्रानंतर ‘महिला पंचायत’ होणार असून त्‍यात ‘स्थानीय महिलांच्‍या समस्या, स्थिती आणि समाधान’ या व‍िषयावर चर्चा होईल. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्या. मीरा खडक्कार राहणार असून एनआयइपीए, नवी दिल्लीदच्या कुलगुरू डॉ. शशीताई वंजारी यांची विशेष उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन करण्‍यात येणार आहे. समापन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून मॉईलच्‍या एचआर डायरेक्‍टर उषा सिंग यांची उपस्‍थ‍िती राहणार असून महिला समन्वयच्या अखिल भारतीय सह-संयोजिका भाग्यश्री साठ्ये यांचे ‘भारताच्‍या विकासात मह‍िलांची भूम‍िका’ या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय, संमेलनस्थळी प्रदर्शनी, साहित्य विक्री, नृत्याविष्कार अशा विविध गोष्टींचे आकर्षण राहणार आहे. या संमेलनाचे पालकत्‍व राजमाता राजेश्‍वरी देवी शाह, संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचनताई गडकरी व कौटुंब‍िक न्‍यायालयाच्‍या न‍िवृत्‍त न्‍या. मीरा खडक्‍कार यांनी स्‍वीकारले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *