मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आ. आशिष शेलार यांचे केले कौतुक
नागपूर समाचार : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी दिनानिमित्त आ. आशिष शेलार यांनी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील दोन ख्यातनाम गायक महेश काळे व राहूल देशपांडे या सुरेल गायकांची मैफल आयोजित केल्याबद्दल आणि रसिकांना त्यांच्या सुमधूर गाण्यांचा मनमुराद आनंद दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळातील व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत कार्यक्रमस्थळी भेट दिली. महेश काळे, राहूल देशपांडे व आ. आशिष शेलार यांच्याशी त्यांनी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वरोत्सवाला हजेरी लावत सुमधूर गीतांचा आस्वाद घेतला.
भाजपा मुंबईचे अध्यक्ष व बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांच्यावतीने व श्री कन्स्ट्रक्शन्स व व्हॅल्युएबलच्या सहयोगाने हॉटेल सेंटर पॉइंट येथे ‘स्वरोत्सव’ या कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक आमदार तसेच, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
सुप्रसिद्ध गायक महेश काळे व राहूल देशपांडे यांना एकाच मैफलीत ऐकणे म्हणजे रसिकांसाठी दुग्धशर्करा योग असतो. शास्त्रीय गायनाच्या शैलीत विविध प्रयोग करणा-या या दोन्ही गायकांच्या गायकीने रसिकांचे कान तृप्त झाले. ‘तुज मागतो मी आता’ या भक्तिगीताने महेश काळे व राहूल देशपांडे यांनी कार्यक्रमाची सुमधूर सुरुवात केली. त्यानंतर महेश काळे यांनी ‘तार वाजे काळजाची’ या गीताने रसिकांच्या हृदयाची तार छेडली. संवादिनी व गिटारच्या स्वरलयीत ‘मोगरा फुलला’ हे गीत सादर करणा-या राहूल देशपांडे यांनी प्रत्येकाच्या मनात आनंदाची लहर फुलवली. या भवनातील गीत पुराने, सुरत पिया की न छिन, बगळ्यांची माळ फुले, हे सुरांनो चंद्र व्हा अशा नाट्यसंगीत, भावसंगीत, चित्रपट संगीतांची मेजवानी या दोन्ही कलाकारांनी रसिकांना दिली. ‘कानडा राजा पंढरीचा’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप केला. याप्रसंगी महेश काळे, राहूल देशपांडे, स्पृहा जोशी व डॉ. रविंद्र शोभणे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन स्पृहा जोशी यांनी केले.