ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खा. तुमाने यांची दालनास भेट व मार्गदर्शन
नागपूर समाचार : दिनांक 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत चाललेल्या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये 44 सर्वाधिक विक्री करणाऱ्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
महोत्सवात सुमारे 57 लाख रुपयापर्यंत नागपुकरांनी खरेदी केली. यामध्ये रुपये 23 लाख 43 हजार 680 किंमतीचा 292 क्विंटल तांदूळ तसेच रूपये 3 लाख 84 हजार 548 रुपये किंमतीचा 39 क्विंटल संत्रा, रुपये 23 लाख 98 हजार 849 रुपये किंमतीचा इतर कृषीमाल तसेच रूपये 5 लाख 75 हजार 996 रुपये किंमतीचे खाद्यपदार्थांचा समावेश आहे. नागपूरकरांचा जिल्हा कृषी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत धान्य कृषी महोत्सवामध्ये आत्मा यंत्रणा नागपूर यांच्यावतीने शनिवार 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून शेतकरी सन्मान दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार कृपालजी तुमाने होते. त्यांनी जिल्हा कृषी महोत्सवाला भेट देऊन शेतकरी गट, उत्पादक कंपनी यांच्या दालनाला भेट दिली व उत्पादनाची माहिती घेऊन चर्चा केली.
अध्यक्षीय भाषणात खा. तुमाने म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा. व शेतमालावर आधारित उद्योगांची ग्रामीण भागात उभारणी करावी व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात.जिल्ह्यातील 44 प्रगतीशील शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजक आत्मा प्रकल्प संचालक डॉ.अर्चना कडू यांनी त्यांचे प्रास्ताविकात जिल्हा कृषी महोत्सवची संकल्पना व या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करून त्यांचे संबंध दृढ करणे व मध्यस्थाची संख्या कमी करून शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळून ग्राहकालाही कमी पैशात दर्जेदार शेतमाल महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे ही संकल्पना रुजविण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन आत्मा प्रकल्प उपसंचालक श्रीमती पल्लवी तलमले यांनी केले. जिल्ह्यातील प्रगती प्रगतशील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त व्यक्त केले व शेतीमधून त्यांनी स्वतःची प्रगती कशी साधली याबाबतची आपले अनुभव कथन केले.
या प्रसंगी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रगती गोखले, मुख्य प्रवर्तक,मिशन मार्केट मिरची- आय आय टी मुंबई यांनी डिजिटल मार्केटिंग या सारख्या आजच्या काळातील विपणन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी आसावरी पोशेट्टीवार यांनी धान पिकाचे बीजोत्पादन या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले व घरच्या घरी बीजोत्पादन करून बियाणे खरेदीवर होणारा अधिकचा खर्च कमी कसा करता येईल याबाबत माहिती दिली.