हाइलाइट…..
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आढावा
- प्रभारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती
नागपूर समाचार : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचे आयोजन तसेच पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यासंदर्भात आज दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी संवाद साधला व या उपक्रमाविषयी आवश्यक दिशानिर्देश दिले. नागपूरातून प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम यांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच आयोजना संदर्भातील तारखा निश्चित करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त 2 जून, 2023 ते 6 जून, 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमांना 2 जून, 2023 पासून प्रारंभ करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकीक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याव्दारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जनमानसांपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे.