- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासनाची तयारी सुरू; सीताबर्डीचा किल्ला 9 ते 4 खुला राहणार

नागपूर समाचार : प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी प्रशासनाने कामाची सुरुवात केली आहे. कस्तुरचंद पार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

कस्तुरचंद पार्क येथे होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाची वेळ सकाळी 9.15 असेल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील जनतेला संबोधित करतील. आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी यावेळी सर्व विभाग प्रमुखांना कामाची माहिती दिली.

सिताबर्डीचा किल्ला सामान्य जनतेसाठी खुला ठेवण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिला. सकाळी नऊ ते चार या वेळेत सीताबर्डीचा किल्ला सामान्य जनतेसाठी खुला राहणार आहे. नागरिकांनी स्वातंत्र्याच्या इतिहासात महत्त्वाच्या असणाऱ्या या स्थळाला भेट देण्याचे आवाहनही यावेळी सुभाष चौधरी यांनी केले.

 कस्तुरचंद पार्कवरील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सायंकाळी 5 वाजता नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून शहरातील नागरिकांनी आपल्या बालगोपाळांसह या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित राहावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *