नागपूर समाचार : महिला बाल विकास मंत्रालयातर्फे एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गरम आहार आणि टेक होम राशन (THR)चा पुरवठा केला जातो. शहरातील विविध बचत गटांनी या अंगणवाडी वाटून घेतल्या आहेत. जवळपास नागपूर शहरात २०० महिला बचत गट हे काम बघत असतात. या बचत गटांचे गेल्या जून महिन्यापासून म्हणजे तब्बल १० महिन्यापासूनच्या बिलाची रक्कम मिळाली नव्हती. या विषयाबाबत अधिवेशनाच्या दरम्यान विधानभवनात संबधित अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली होती. तसेच आयुक्तांकडेदेखील निवेदन देण्यात आले पण यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे बचत गटांच्या महिलांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. संबधित विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन प्रलंबित देयकाचा विषय मा.आमदार प्रवीण दटके यांच्याकडे मांडण्यात आला व त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याशी चर्चा करून शहरी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व ताबडतोब महिला बचत गटांची दहा महिन्यांपासुनची देयके देण्यात यावे, असे आदेश दिले. आयुक्तालयाकडून त्वरित कार्यवाही करण्यात आली असून महिला बचत गटाच्या महिलांची त्वरित मदत आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नांतून झाली आहे. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पराते, महिला बचत गटाच्या महिला प्रतिनिधी मंदा पाटील, भारती गायधने यांनी आभार व्यक्त केले आहेत.