नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेत अनिल पांडे आणि प्रमेशा झाडे हे अनुक्रमे रायफल आणि पिस्टल प्रकारात ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले. आहुजा नगर येथील तालुका क्रीडा संकुल येथे रायफल शूटिंग स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेमध्ये १४, १७, १९ वर्षाखालील आणि खुल्या गटात मुले व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या खेळाडूंमध्ये झालेल्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या खेळाडूंना ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ म्हणून गौरविण्यात आले. रायफल प्रकारात अनिल पांडे यांनी खुल्या गटातील विजेता आदित्य जगताप यांना मात देत विजय मिळविला. पिस्टल प्रकारामध्ये परमेशा झाडे यांनी प्रियांक पाध्ये यांना मात दिली. स्पर्धेत रायफलमध्ये आदित्य जगताप आणि पिस्टलमध्ये प्रियांक पाध्ये उपविजेता ठरले.
सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अजय हिवरकर, डॉ. विवेक साहु, नरेंद्र इंगडे, खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेचे कन्वेनर नवनीत सिंग तुली, नॅशनल शूटर हर्षल झाडे आदी उपस्थित होते.