- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर/रामटेक समाचार : रामटेक येथे 19 जानेवारीपासून राज्‍यातील पहिला ‘महासंस्कृती महोत्सव’ 

मुख्यमंत्री,उपमुख्‍यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्‍ते होणार उद्घाटन 

गीत, संगीत, नाट्यकलेचा अनुभवता येणार आविष्‍कार 

नागपूर समाचार : महाराष्‍ट्र शासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍यावतीने व जिल्‍हा प्रशासनाच्‍या समन्‍वयाने राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यांमध्‍ये प्रथमच ‘महासंस्‍कृती महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात येत आहे. या महासंस्‍कृती महोत्‍सवाचा प्रारंभ कालिदासाची भूमी रामटेक येथून होत असून शुक्रवार, 19 जानेवारी रोजी नेहरू मैदान, रामटेक येथे सायंकाळी 7 वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होईल. 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मुक्ता विष्णू कोकड्डे, यांच्‍यासह खा. कृपाल तुमाने, सर्व आमदार श्री. प्रवीण दटके, श्री. अभिजित वंजारी, श्री. चंद्रशेखर बावनकुळे, श्री. सुधारक अडबाले, श्री. अनिल देशमुख, डॉ. नितीन राऊत, श्री. कृष्णा खोपडे, श्री. विकास कुंभारे, श्री. मोहन मते, श्री विकास ठाकरे, श्री. समीर मेघे, श्री. आशिष जायस्वाल, श्री. राजू पारवे, श्री. टेकचंद सावरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. विकास खरगे, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 पाच दिवस होणार्‍या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व यांनी केले आहे.राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्‍सवाचा प्रारंभ ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्‍या कवी कालिदासाची भूमी रामटेक येथून होत आहे.

19 ते 23 जानेवारी दरम्‍यान रामटेक येथील नेहरू मैदानावर होणा-या या पाच दिवसीय महोत्‍सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती म‍िळणार असून आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या कलाकारांच्या सहभाग राहणार आहे.

पाच दिवस दोन सत्रात हे कार्यक्रम होतील. सकाळच्‍या सत्रात कविकालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महाखिचडीचे प्रात्यक्षिक, लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आदींचे आयोजन करण्‍यात येणार आहे. 

सायंकाळच्‍या सत्रातले मुख्‍य कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता सुरू होतील. यात उद्घाटनाच्‍या दिवशी 19 जानेवारीला पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका सादर होणार आहे. 20 जानेवारीला सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीतगायन होणार असून 21 जानेवारीला विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तीगीत कार्यक्रम, 22 जानेवारीला रामटेकवरील सिंधुरागीरी महानाट्य, 23 जानेवारीला विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

रामटेक व नागपूरकरांसाठी ही सांग‍ित‍िक पर्वणी असून या सर्व कार्यक्रमांचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन आमदार आशिष जायस्‍वाल, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे संचालक श्री. बिभीषण चवरे व जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

असे आहेत कार्यक्रम

19 जानेवारी – पद्मश्री हेमामालिनी यांची रामायण नृत्यनाटिका

20 जानेवारी – सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीतगायन

21 जानेवारी – विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तिगीत कार्यक्रम 

22 जानेवारी – रामटेकवर आधारित ‘सिंधुरागीरी’ महानाट्य

23 जानेवारी – विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची ‘स्वरसंध्या’ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *