नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील हँडबॉल स्पर्धेत शुक्रवारच्या (ता.19) सामन्यांमध्ये फ्रेन्ड्स क्लब संघाचा दबदबा दिसून आला. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महिलांच्या खुल्या गटात फ्रेन्ड्स क्लबचा सामना तायवाडे कॉलेज संघासोबत झाला. या सामन्यात फ्रेन्ड्स क्लबने 15-0 असा एकतर्फी विजय मिळविला. पुरूषांच्या खुल्या गटात धनवटे नॅशनल कॉलेज विरुद्ध फ्रेन्ड्स क्लबने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत 18-8 असा दमदार विजय नोंदविला.
महिला खुल्या गटातील अन्य सामन्यांमध्ये युनिक गर्ल्स संघाने आरडीएसए देवलापार संघाचा 16-1 ने पराभव केला. तर केंद्रीय विद्यालयाला 20-1 अशी मात देत अजिंक्य क्लबने विजय मिळविला. पुरूष खुल्या गटात अजिंक्स क्लबने केंद्रीय विद्यालय अ संघाचा 18-16 असा पराभव केला.
17 वर्षाखालील मुलांच्या सामन्यात मात्र अजिंक्य क्लबला केंद्रीय विद्यालय संघाकडून 15-13 असा पराभव स्वीकारावा लागला. तर अन्य सामन्यात लखोटीया हायस्कूल संघाने लखोटीया सीबीएसई संघाचा 15-12 ने पराभव करून विजय नोंदविला.