- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर/रामटेक समाचार : भजन, गझल, गाजलेल्या गाण्यांचे श्रोत्यांवर गारूड; सुरेश वाडकरांच्या जादूई सूरांनी गाजविला महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस

हजारोंच्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती ; विदर्भाच्या अयोध्येत आज हंसराज रघुवंशी यांचे भक्तीगीत

नागपूर समाचार : विख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या जादूई सूरांनी महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.रामटेक गडकिल्याच्या पायथ्याशी भक्तीगीत, भजन, गाजलेली चित्रपट गाणी, गझल त्यांनी आपल्या मधूर आवाजात सादर केली. हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोते आणि मनाला भिडणारा सुमधुर स्वर अशी साद- प्रतिसादाची मैफल रामटेकरांनी अनुभवली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रामटेक येथील नेहरू मैदानावर पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ काल करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी रामायणावर आधारित नृत्य नाटिकेचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली होती. त्यानंतर आज दुस-या दिवशी आवाजाचे जादूगर सुरेश वाडकर यांची गाणी श्रोत्यांच्या हृदयाला भिडली.

सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाणी गायली. अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. हिंदी-मराठीच नव्हे तर भोजपुरी, सिंधी आणि कोकणी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. आज त्यांच्या याच गाण्यांना पुन्हा एकदा नेहरू स्टेडियमवरील श्रोत्यांची वाहवा मिळविली.

नेहरू मैदानावर त्यांनी सादर केलेल्या ‘मेघा रे मेघा रे’, ‘ए जिंदगी गले लगाले’ , लगी आज सावन की फिर वो झडी है, सांज ढले गगन तले, और इस दिल मे क्या रखा है, मैं हू प्रेम रोगी यांसारख्या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. ‘प्रेमरोग’, ‘सदमा’ या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांवर अक्षरशः गारूड केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी गुरुवंदना गायली.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी आ. ॲड. आशीष जायस्वाल, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

उद्या, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम निःशुल्क असणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *