नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सीनिअर गटात वाशिमचा विजय शिंदे आणि नागपूर ग्रामिणची कल्याणी मोहारे यांनी प्रतिस्पर्धकांना धुळ चारत विजयाची गदा उंचावली. झिंगाबाई टाकळी येथील श्रीराम मंदिर, राठी लेआउट, झेंडा चौक येथे शुक्रवारी (ता.19) रात्री विदर्भ स्तरीय कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.
सीनिअर पुरूष गटात 74 किलोवरील वजनगटात वाशिमच्या विजयने अमरावतीच्या शोएब अब्दुलला मात देत सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली. शोएबने रौप्य तर चंद्रपुरच्या अश्विन खनके ने कांस्य पदक पटकाविले. सीनिअर महिला गटात 62 ते 76 या खुल्या किलो वजनगटात नागपूर ग्रामीणच्या कल्याणी मोहारे ने अमरावतीच्या गौरी धोटेला चितपट करीत विजेतेपद पटकावले. गौरीने दुसरे तर चंद्रपुरच्या नंदिनी थापाने तिसरे स्थान प्राप्त केले.
सीनिअर पुरूषांच्या 74 किलो वजनगटात वाशिमचा रवी यदमळकर विजेता ठरला. त्यांनी अमरावतीच्या अभिषेक पोमळेकरला मात दिली. नागपुरचा सागर भोयर कांस्य पदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या 62 किलो वजनगटात अकोल्याची किरण सुतार ने नागपूरच्या नंदनी साहु ला हरवून विजय मिळविला. तिस-या स्थानासाठी झालेल्या स्पर्धेत चंद्रपुरची सुचिता ठेंगरे विजेती ठरली.