कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा..
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट शहरातील तसेच ग्रामीण भागातील उद्योगांना राज्य शासनाने दि.१ ऑक्टोबर २०१६ पासुन कामगार विमा दवाखान्याची सुविधा लागू केली आहे.
या अनुषंगाने कामगारांना कोणत्याही आजाराचे तसेच हितलाभाचे वेतन ऑफलाईन होत होते परंतु ई.एस.आय.सी. हिंगणघाट कार्यालयाकडून कामगारांना आजाराच्या सुट्टीचे किंवा हितलाभाचे क्लेम कामगारांना स्वतः आँनलाईन करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे, यामुळे कामगारांना मिळणाऱ्या हितलाभाचे वेतन त्यांचे बँकखात्यात जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
उपरोक्त समस्येसंदर्भात वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे तसेच पीव्ही टेक्सटाइल जाम येथील कामगार प्रतिनिधी यांनी सुधिर पांडे, पंकज त्रिपाठी,अमृतसिंग ठाकुर, नरेंद्र रघाटाटे, प्रमोद शेंडे इत्यादीनी ई.एस.आय.सी.
कार्यालय हिंगणघाट येथे भेट देऊन संबंधीत अधिकारी निरज साखरकर यांना निवेदन दिले.
हिंगणघाट शहरी व ग्रामीण भागातील उद्योगांमधील ९० टक्के कामगार ग्रामीण भागातील रहिवासी असून तो कामगार डिजीटल टेक्नालाजी सोबत अवगत नाही.
त्यांना कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन प्रणालीची माहिती नसल्याने हे कामगार उपरोक्त माहिती आँनलाईन अपलोड करू शकत नाही.
महत्वाचे म्हणजे ही कार्यप्रणाली अशिक्षित असलेल्या कामगारांसाठी लागू केली असतांना हिंगणघाट येथिल ई.एस.आय.सी. डिस्पेंसरी मधील वैद्यकिय अधिकारी सुद्धा ऑनलाईन सर्टिफिकेट अपलोड करत नाही, मात्र याउलट उच्चशिक्षित डॉक्टरांना संगणक कार्य प्रणालीचे कुठलेही निर्देश देण्यात येत नाही. परंतु अल्प शिक्षीत व संगणक कार्य प्रणाली अवगत नसलेल्या कामगारांना ऑनलाइन कार्य प्रणाली बंधनकारक केल्याने कामगारांना मानसिक तसेच आर्थिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ई.एस.आय.सी. कार्यालयाचेअधिकाऱ्यानी ऑनलाईन क्लेम सबमिट करण्याचा निर्णय मागे घेऊन पुर्वीप्रमाणे कामगारांचे आजाराचे किंवा कोणत्याही हितलाभाचे पगार ऑफलाईन प्रमाणे चालू ठेवावे. अशी मागणी वर्धा जिल्हा सुती मिल मजदुर संघटनेच्या वतीने करण्यात आली.
ई.एस.आय.सी. हिंगणघाट अधिकारी कडून असे आश्वासन देण्यात आले की, कामगारांच्या समस्या वरीष्ठ स्थरावर कळविण्यात येऊन त्याचे निराकरण करण्यात येईल.
कामगारांच्या या मागणीचा तात्काळ विचार न झाल्यास विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तसेच उपक्षेत्रीय कार्यालय, नागपूर येथे आंदोलन करण्याचा इशारा वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचेवतीने दिला आहे.