बी.प्राकचे लाईव्ह कॉन्सर्ट : सोहळ्याच्या पार्कींगसाठी विशेष व्यवस्था
नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्या रविवार 28 जानेवारी रोजी समारोप होणार आहे. उद्या रविवारी यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल. यावेळी सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक बी.प्राकचे लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी नि:शुल्क वाहन पार्कींगची देखील विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था यशवंत स्टेडियमपुढील जागेवर करण्यात आलेली आहे. तर चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी पटवर्धन मैदान तसेच महामेट्रोच्या मैदानामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये ‘तेरी मिट्टी में मिल जावां…’ फेम सुप्रसिद्ध हिंदी, पंजाबी गायक बी. प्राक यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रम नि:शुल्क असून स्टेडियममध्ये प्रवेशासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डीतील ग्लोकल मॉलमधील मुख्य कार्यालयासह वीर सावरकर चौकातील केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी सकाळी प्रवेशिका उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्वरीत आपल्या प्रवेशिका प्राप्त करून कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असेही आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय समारंभात यंदा क्रीडा भूषण पुरस्कारासोबतच तीन नवीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट संघटना असे तीन नवीन पुरस्कार यंदा मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहेत. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे तीनही पुरस्कार्थींची निवड करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक आणि उत्कृष्ट संघटकाला स्मृतीचिन्ह व प्रत्येकी 51 हजार रुपये रोख तसेच उत्कृष्ट संघटनेला स्मृतीचिन्ह व 1 लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असेल. याशिवाय दरवर्षी दिल्या जाणाऱ्या क्रीडा भूषण पुरस्कारासाठी विविध खेळांच्या खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले असून त्यापैकी निवड झालेल्या खेळाडूंना स्मृतीचिन्ह व 25 हजार रुपये रोख असे स्वरूप असलेला क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.