गोंदिया समाचार : शिक्षण, सिंचन, उद्योग आदिंच्या माध्यमातून गोंदियाचे सुपूत्र मनोहरभाई पटेल यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासात मोलाचे योगदान देताना नगर परिषदेपासून ते संसद आणि विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी भरीव कार्य केले आहे. या नगर परिषदेचे सुसज्ज भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासन ३० कोटींचा निधी देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार राज्य शासन गतीने जनहिताचे कार्य करीत आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदिंमध्ये राज्य अग्रेसर आहे. राज्य शासनाच्या प्रस्तावांना केंद्राकडूनही मंजुरी मिळून राज्यातील विविध प्रकल्प व योजनांना गती प्राप्त झाली आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला ५ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे ध्येय ठेवले आहे. यालाच प्रतिसाद देत राज्य शासनानेही यामध्ये राज्याची १ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी खासदार प्रफुल पटेल यांनी प्रास्ताविकात गोंदिया-भंडारा भागात मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेले शिक्षणाचे जाळे तसेच कृषी, सिंचन, राजकारण आदी क्षेत्रात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.
यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रिडापटू आणि पत्रकारांना गौरविण्यात आले. तसेच संश्रुती चव्हाण, काजल रुखमोडे, दिव्या पहीरे, पर्व अग्रवाल, लक्ष्य अग्रवाल, अस्मिता कोसळकर, मेघा चौरसिया, प्रियांशी राठोड, गार्गी वैरागडे, नंदिनी साठवणे, मेघा मिश्रा, साक्षी खंगार, प्राची लेंडे, हेमंत बघेले, सुरुची मुळे, निधी चौरसिया, मुकेश सुलाखे, विक्रांत ठाकूर, वंशिका कटरे, हर्षिता शर्मा आणि राजा अग्रवाल या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ. देवाशिष चॅटर्जी आणि राजु हाजी सलाम पटेल यांना सन्मानपत्र देण्यात आले. पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानासाठी अंकुश गुंडावार, मिलिंद हळवे, रवी सपाटे आणि प्रशांत देसाई यांचा सन्मान करण्यात आला. प्रगतिशील शेतकरी दुर्गेश कांबळे आणि शिवाजी गहाणे यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्रीडापटू वैष्णवी गभणे आणि मुन्नालाल यादव यांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जैन यांनी केले. यावेळी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.