- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर समाचार : वने आणि वन्यजीव संवर्धनासाठी जनतेनी पुढाकार घ्यावा – वने मंत्री सुधीर मुगंटीवार

वने मंत्री यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पातील विविध उपक्रमांचा शुभारंभ

नागपूर समाचार : पर्यावरण आणि मानवी समाजाच्या विकासात वने, वन्यजीवांचे अनन्य साधारण महत्व असून त्यांच्या संवर्धनासाठी जनतेने पुढाकार घ्यावा,असे आवाहन वने सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पेंच व्याघ्र प्रकल्पात विविध विकासात्मक कामे व उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी केले.

श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते आज पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार नूतन सफारी गेट, कोलितमारा येथे परमोटरींग व हॉट एअर बलून हा साहसी क्रीडा उपक्रम, वाघोली तलाव येथे डार्क स्काय प्रकल्प आणि हत्ती कॅम्प, सिल्लारी येथे पर्यावरणपूरक पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन आदिंसह विविध उप्रकमांचा शुभारंभ झाला या प्रसंगी ते बोलत होते. 

आमदार ॲड. आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या सदस्य शांता कुमरे, पिपरिया गावचे सरपंच प्रवीण उईके,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास, नागपूर वन वृत्ताच्या वनसंरक्षक श्री लक्ष्मी,पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास वाढविण्यास उत्तम कार्य झाले आहे. या व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागात सर्व महत्वाची संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज्य शासनाने वनक्षेत्रातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आस्थापना खर्च वजात करून तेंदूपत्ता मजुरांना 72 कोटी रुपयांचे बोनस देण्यात आले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 25 लाखांची सानुग्रह मदत करण्यात येते. या दोन्ही तरतुदी देशात फक्त महाराष्ट्रानेच केल्याचे त्यांनी नमूद केले.

वटवृक्ष वाढीसाठी वन विभागाने शासन निर्णय काढला असून वड,पिंपळ आदी वृक्षांची लागवड व्हावी आणि वृक्ष जगवणारे हात वाढले पाहिजे.वृक्ष, वन्यजिवांचा अधिवास वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान चंद्रपूर येथे ‘ताडोबा महोत्सव’ आयोजित करण्यात येणार असून देशभरातील वनमंत्री यात सहभागी होणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

पाच उपक्रमांचे आभासी पद्धतीने उद्घाटन

या कार्यक्रमात आवळेघाट येथील स्वराज दुग्धसंकलन केंद्र, नागलवाडी येथील प्रगती अगरबत्ती निर्माण केंद्र,सुवरधरा येथील सुवरधरा शिलाई केंद्र, नरहर येथील वंदे मातरम वन ई-सेवा केंद्र आणि जटायु (गिधाड) संवर्धन प्रकल्पाचे श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते आभासीपद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी व स्थानिक नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.तीन वनरक्षकांना ‘स्टार ऑफ द मंथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलद बचाव दलामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. प्राथमिक प्रतिसाद दलातील दोन कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले. ‘अंगार मुक्त पेंच स्पर्धेती’ल विजेत्या पाच ग्रामपंचायतींना यावेळी सन्मानित करण्यात आले.

व्यावसायिक सामाजिक जबाबदारीद्वारे (सीएसआर) पेंच व्याघ्र प्रकल्पाला विविध विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कॉफीटेबल बुक’ आणि ‘पक्षी सर्वेक्षण अहवाला’चे विमोचन करण्यात आले.

ॲड. आशिष जयस्वाल यांनीही उपस्थितांना संबोधित केले. महिप गुप्ता यांनी प्रास्ताविक केले तर रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.

तत्पूर्वी, श्री मुनगंटीवार यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पास भेट देत येथील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. सर्वप्रथम त्यांनी खुर्सापार नूतन सफारी गेटचे उद्घाटन केले. येथेच त्यांनी निसर्ग मार्गदर्शक आणि जिप्सी चालक यांना गणवेश वाटप केले. व्यावसायिक सामाजिक जबाबदारीद्वारे (सीएसआर) पेंच व्याघ्र प्रकल्पास देण्यात आलेल्या जेसीबीचे हस्तांतरण श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.या परिसरातील तिकीट घर, स्मरणिका व वस्तू विक्री केंद्र, उपहारगृह, स्वच्छतागृह,सुसज्ज कार्यालयाचेही उद्घाटन त्यांनी केले.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सील्लारी गेट परिसरातील विविध उपक्रमांचे श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. येथील पिपरिया गावाशेजारील कोलितमारा येथे परमोटरींग व हॉट एअर बलून हा साहसी क्रीडा उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.वाघोली तलाव येथे ‘डार्क स्काय प्रकल्प’ आणि ‘हत्ती कॅम्पचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. अमलतास येथे श्री.मुनगंटीवार यांनी विविध उपक्रमांच्या स्टॉल्सला भेट दिली व पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *