नागपूर समाचार : नागपूरचे प्रसिद्ध शेफ ‘विक्रमवीर’ विष्णू मनोहर 19 फेब्रुवारी 2024 रोजी अयोध्येत 7000 किलो वजनाचा ‘श्री राम भोग हलवा’ बनवून नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत.
‘कारसेवा ते पक्षसेवा’ या कार्यक्रमांतर्गत श्री हनुमत संस्कृत पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात 7000 किलोचा श्री राम भोग हलवा तयार करण्यासाठी श्री हनुमत संस्कृत पदव्युत्तर महाविद्यालय, हनुमानगढ निर्वाणी आखाडाने त्यांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला हनुमान गढी अयोध्या धामचे श्री 108 महंत प्रेमदास महाराज पिठासीन, श्री अयोध्या नरेल बिमलेंद मोहन प्रताप मिश्र, खासदार श्री लल्लू सिंह जी, आमदार श्री वेदप्रकाश गुप्ता, महापौर श्री महंत गिरीशपती त्रिपाठी, वडोदरा गुजरातचे श्री मिलिंदजी वैद्य यांची उपस्थिती राहणार आहे.
भगवान विष्णूंना रव्यापासून बनवलेले गोड पदार्थ आवडतात तर प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे सत्यनारायण पूजेमध्ये रव्याच्या शि-याला अधिक महत्त्व दिले जाते. सत्यनारायण पूजेसाठी तयार केल्या जाणा-या प्रसादासारखाच हा हलवा केळीचे तुकडे टाकून तयार केला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील लोकांसाठी हा एक नवीन प्रयोग असेल. हलवा बनवण्याआधी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाईल. विष्णू मनोहर रामनाम असलेले वस्त्र परिधान करतील व महंतांच्या मंत्रांच्या उच्चारात श्री राम भोग हलवा तयार करायला सुरुवात करतील.
या 7000 विशाल भोग प्रसादासाठी 10 फूट बाय 10 फूट आकाराची कढई वापरली जाणार असून सराटा 24 किलोचा आहे. हा भोग हलवा बनवण्यासाठी 1000 किलो रवा, 1000 किलो तूप, 1400 किलो साखर, 4500 लिटर पाणी (मिनरल वॉटर), 21 किलो वेलची पावडर, 21 किलो जायफळ पावडर, 250 डझन केळी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय काजू, बेदाणे, बदाम आदी सुमारे 200 किलो सुका मेवा वापरण्यात येणार आहे. हलवा बनवायला 3 ते 4 तास लागतील. हा श्री राम भोग हलवा श्री राम लल्लाला अर्पण केला जाईल आणि त्यानंतर हा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जाईल.