- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मनपाच्या जलकुंभ व तीन आरोग्य मंदिराचे लोकार्पण

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकाद्वारा बांधण्यात आलेल्या पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील कामाक्षी नगर जलकुंभ, वाठोडा जलकुंभ तसेच लकडगंज झोन येथील मिनिमाता नगर, चकोले दवाखाना आणि नेहरू नगर झोन येथील स्वतंत्र नगर नंदनवन झोपडपट्टी या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांचे तथा नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने आयोजित ई-लायब्ररी भूमिपूजन, आदर्श नगर मालकी हक्क रजिस्ट्री वाटप आणि मोचीपुरा गार्डन नविनिकरण यांचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता.२५) लोकार्पण करण्यात आले.  

टेलिफोन एक्सचेंज चौक दळवी रुग्णालय जवळ गरोबा मैदान येथे आयोजित कार्यक्रमात सर्वश्री आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष श्री. मनोजकुमार सूर्यवंशी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड,अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, सहाय्यक आयुक्त श्री. गणेश राठोड, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माजी नगरसेवक श्री. प्रदीप पोहाने, श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर श्री.प्रमोद पेंडके, श्री. मनोज चाफले, श्री.चेतना टांक, मनीषा धावडे, मनिषा कोठे, अनिल धावडे यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रकल्पाची माहिती

कामाक्षी नगर जलकुंभाची क्षमता 10 लक्ष लीटर असून या मधून कामाक्षीनगर क्षेत्रातील शैलेश नगर को-ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी, घरसंसार सोसायटी, सालासर विहार कॉलनी, कामाक्षी नगर, उमीया कॉलनी, मलघडे लेआउट, वाठोडा जुनी वस्ती, अष्टविनायक सोसायटी, सदाशिव नगर, वेदभूमि सोसायटी, कुर्वे लेआउट वस्त्यांना जलपुरवठा होणार आहे. सध्या या वस्त्यांना भरतवाडी (देशपांडे) जलकुंभावरून पाणी पुरवठा होत आहे.

तसेच वाठोडा जलकुंभावरून लकडगंज झोन अंतर्गत मेहेर नगर, खंडवाणी टाउन, वैष्णोदेवी नगर, साहील नगर, राज नगर, सरजू टाउन, हिमांशू ले आउट या वस्त्यांच्या पाण्याचा दाबामध्ये व वेळेमध्ये वाढ होणार आहे. या जलकुंभाची क्षमता 20 लक्ष लीटर असून येथील वस्त्यांमध्ये मनपातर्फे टँकरव्दारे होणारा पाणी पुरवठा बंद होणार आहे आणि नागरिकांना नळाव्दारे पाणी मिळणार आहे, याशिवाय दोन्ही जलकुंभावरून भविष्यात 24बाय7 पाणी पुरवठा करण्याचा सुध्दा मनपाचा प्रयत्न असणार आहे. 

तसेच 15व्या वित्त आयोगा अंतर्गत नागपूर महानगरपालिका करिता 113 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर करण्यात आलेले असून, लकडगंज झोन येथील मिनीमाता नगर, चकोले दवाखाना आणि नेहरूनगर झोन येथील स्वतंत्रनगर,नंदनवन झोपडपटटी येथे आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे, या आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत मिळणार आहेत .तसेच नोंदणी शुल्क घेतल्या जाणार नाही. प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक सेवा यामार्फत उपलब्ध होतील. तसेच बाह्यरुग्ण सेवा, गरोदर माता तपासणी, लसीकरण ( माता व बालक), उच्च रक्तदाब व मधुमेह निदान व उपचार आदी सोयी दिल्या जाणार आहे. तसेच आवश्यक निवडक रक्त तपासणी ही HLL मार्फत करण्यात येणार आहे. यामाध्यमातून नागरिकांना चांगल्या सोयी मिळतील व नागरीक मोठया संख्येने लाभ मिळेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती श्वेता शेळगांवकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *