नागपूर समाचार : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागांतील सुविधांच्या नवनिर्मिती आणि दुरूस्तीकरिता महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे जाहीर २०४ कोटी रुपये निधीतून होणा-या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेद्वारे झोननिहाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.नागपूर शहरात २२ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले. नदी, नाल्यांच्या भिंती तुटल्या, रस्ते देखील खराब झाले. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस,राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.अनिल पाटील यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला होता.
शहरातील बाधित मलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य सरकारने नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेज जारी केले.
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत क्षतिग्रत भागातील मुलभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्याकरिता रु. २०४.७१ कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली या खर्चामधून ८.४१ किमी अंतराचे नदी आणि नाल्यांच्या क्षतिग्रस्त भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे या साठी रु. १६३.२३ कोटी रक्कम मान्य केली. तर ६१.३८ किमी अंतराच्या क्षतिग्रस्त रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी रु. ४१.४८ कोटी रक्कम मान्य केली.
विविध झोन अंतर्गत येणारे क्षतिग्रस्त रस्ते तसेच नदी व नाल्यांच्या भिंतींच्या बांधकामाकरिता झोननिहाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्षतिग्रस्त भागांच्या दुरूस्तीचे कार्य सुरू केले जाणार आहे.