नागपूर/काटोल समाचार : एकिकड़े नैसर्गिक आपत्तींचा सामना करत असतानाच दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले असले तरीही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सरकारविरोधात नाकर्तेपणाची अंतयात्रा काढण्यात आली. काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे नेते प्रदीप उबाळे पाटील तसेच सागर दुधाने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी काळा दिवस म्हणून पाळण्यात आला.
कापसाला किमान १० हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्या, सोयाबीनला किमान ७ हजार, चण्याला १० हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्या, महिलांना मध्यप्रदेशातील लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, शेतीला दिवसा पूर्णवेळ वीज पुरवठा करण्यात यावा, जंगली श्वापदांपासून शेतीच्या संरक्षणासाठी व्यवस्था करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या आंदोलनात जिल्ह्यातील असंख्य शेतकरी काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते.