नागपूर समाचार : सिंदी ड्रायपोर्ट सुरू झाल्यावर विदर्भातील उद्योगांना निर्यातीसाठी एक सशक्त माध्यम उपलब्ध होणार आहे. एमआयडीसीमधील उद्योगांना याचा विशेषत्वाने खूप फायदा होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले.
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. श्री. नितीन गडकरी बोलत होेते. यावेळी एमएसएमईचे संचालक श्री. पार्लेवार तसेच असोसिएशनचे पदाधिकारी सी.एम. रणधीर, श्री. मोहन, अरुण लांजेवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी यांनी एमआयडीसी परिसरातील पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासंदर्भात तसेच येथील उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याची सूचनाही केली. बुटीबोरीतील औद्योगिक वसाहत खूप मोठी आहे. याठिकाणी बराच विकास झाला आणि आणखी बरीच कामे भविष्यात होणार आहेत, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.