- Breaking News, नागपुर समाचार, राजनीति

नागपूर समाचार : मोदी सरकारने युवकांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘नमो युवा संमेलन’

नागपूर समाचार : काॅंग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत्या. तरुणांची रोजगारासाठी वणवण होती. देश कर्जात बुडाला होता. काॅंग्रेसने गरिबी हटविण्याचा नारा दिला, पण गरिबी ऐवजी गरीबच हटविले. २०१४ मध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत संपूर्ण चित्र बदलले. परिवार वाद आणि खोट्या आश्वासनांमधून देश मुक्त झाला. पोर्ट, एअरपोर्ट, महामार्ग आणि रेल्वेचे जाळे विस्तारले. उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला.

मोदी सरकारने युवकांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात आयोजित नमो युवा संमेलनामध्ये ना. श्री. नितीन गडकरी बोलत होते.

यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवक मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झाले होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक गावात चांगल्या शाळा, दवाखाने, उद्योग आणि रोजगार कसे येईल यावर भर दिला.

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले. जे आश्वासन दिले ते पूर्ण केले आणि म्हणूनच जनतेच्या मनात स्थान मिळविले.’ ‘निती आयोगाने देशात गरिबी कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. येणाऱ्या काळात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होऊन जगात तिसऱ्या क्रमांकावर आपला देश असेल. मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य केले आहे. ‘योग्य निती आणि योग्य नेता’ यामुळेच हे होऊ शकले,’ असे ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले. देशात परिवर्तन घडविण्याची शक्ती पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आहे, याची प्रचिती संपूर्ण देशाला आली आहे. त्यामुळे सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुणांनी पार पाडावी, असे आवाहन देखील ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.

देश अंध:कारातून विकासाकडे – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी

मोदी सरकारच्या काळात गरिबांची बॅंकेत खाती उघडली, महिलांना सन्मान मिळाला, ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य मिळाले, जम्मू काश्मीर ३७० कलममधून मुक्त झाले, अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. देशात पायाभूत सुविधा, रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. काॅंग्रेस सरकारने निर्माण केलेल्या अंध:कारातून देश आता विकासाकडे निघाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

गरिबांना सक्षम करून अर्थव्यवस्था मोठी केली

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस*देशात जे ५० वर्षे झाले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले. नव्या शैक्षणिक धोरणाने शिक्षण केवळ पदवीपूरता मर्यादित ठेवले नाही. रोजगार आणि स्वयंरोजगाराचे दालन खुले करणारे कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. मातृभाषेतून शिक्षण घेता येणार आहे. मोदीजींनी गरिबांना सक्षम करून अर्थव्यवस्था मोठी केली, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *