नागपुरातील भजन मंडळांना साहित्याचे वितरण
नागपूर समाचार : समाजात धार्मिक व आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढणे आणि तिच्यावर आध्यात्मिक संस्कार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचन गडकरी यांच्या हस्ते आज नागपुरातील भजन मंडळांना साहित्य वितरित करण्यात आले. या साहित्यात टाळ, तबला आणि हार्मोनियमचा समावेश आहे. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘नागपूर शहरात मोठ्या संख्येने भजन मंडळ अस्तित्वात आहेत. या मंडळांच्या वतीने नियमित समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे.
यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत देखील तीनशेहून अधिक मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या भजन मंडळांचे कार्य निरंतर सुरू राहावे आणि नवीन पिढीला संस्कारित करीत राहावे, या उद्देशाने भजन साहित्याचे वितरण करण्यात आले,’ असे ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले. यावेळी नागपुरातील भजन मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची आवर्जून उपस्थिती होती.
महिलांनी मानले ना. श्री. गडकरींचे आभार
नागपुरातील भजन मंडळांना निःशुल्क साहित्य वाटप केल्याबद्दल महिलांनी केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे आभार मानले. खासदार भजन स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर आता भजन मंडळांचे उपक्रम सातत्याने सुरू राहावे, यासाठी पाठबळ दिल्याबद्दल या महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. काही मंडळांनी साहित्य स्वीकारल्यानंतर टाळ वाजवून भजन गाऊनच आनंद देखील व्यक्त केला.