- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : पूर्व नागपुरातील विकासकामे ठरतील ‘गेम चेंजर’ – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

वाठोडा येथे भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकारी संमेलन

नागपूर समाचार : गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात एक लाख कोटींची कामे केली आहेत. त्यात पूर्व नागपुरात तर विक्रमी कामे झाली आहेत. भुयारी मार्ग, उड्डाणपूल, काँक्रिटचे रस्ते अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या भागातील विकासकामे निवडणुकीत गेम चेंजर ठरतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी (शनिवार) येथे व्यक्त केला.

वाठोडा येथील हॅरिसन लॉनमध्ये आयोजित भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकारी संमेलनात ना. श्री. नितीन गडकरी बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, श्री. बाल्या बोरकर, श्री. संदीप गवई, श्री. सेतराम सेलोकार, श्री. धर्मपाल मेश्राम, श्री. प्रमोद पेंडके, श्री. देवेंद्र दस्तुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनाला पूर्व नागपुरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘मी लहानपणी या भागातून फिरलो आहे. त्यावेळी रस्त्यांची अवस्था वाईट होती. आज अतिशय उत्तम रस्ते झाले आहेत. या भागात सिम्बॉयसिससारखी संस्था आली. पिण्याचे पाणी सर्व वस्त्यांमध्ये पोहोचले आहे. आता तर आणखी ८९ जलकुंभ संपूर्ण नागपुरात होत आहेत. त्याचा फायदा गोरगरीब जनतेलाच होणार आहे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘यावेळी मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आपल्याला विरोधकांना मिळणारी मते कमी करायची आहेत आणि ती भाजपला जोडायची आहेत. प्रभागानुसार मिळालेल्या मतांचा अभ्यास करावा लागेल. पूर्व नागपुरातून यापूर्वीच्या निवडणुकीत सर्वांत मोठी आघाडी होती. यंदा त्याहीपेक्षा जास्त मोठी आघाडी मिळेल असा विश्वास आहे,’ मी लोकांना प्रत्यक्ष येऊन भेटणार आहे. त्याच माध्यमातून लोकांशी संपर्क साधून आशीर्वाद घेणार आहे. पूर्व नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत येथील नागरिकांवरही पूर्ण विश्वास आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

‘विकासात व्यापाऱ्यांचे योगदान मोठे’

व्यापाऱ्यांचे मोठे योगदान विकासात राहिले आहे. भविष्यातही व्यापाऱ्यांच्या सहकार्यानेच शहराचा कायापालट करता येणार आहे. त्यामुळे विरोधी विचारांच्या घरी जाऊन आपल्या विकासकामांची माहिती द्या. आपल्याला मोठी आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी रजवाडा पॅलेसमध्ये आयोजित व्यापारी आघाडीच्या संमेलनात व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *