ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या मेळाव्याला उपस्थिती
नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मेळाव्याला उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. पांडे ले-आऊट येथील सांस्कृतिक सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संजय भेंडे, प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, विश्वस्त नानासाहेब समर्थ, गोपाल बोहरे, डॉ. संजय उगेमुगे, मेहमूद अंसारी, गौरी चांद्रायण, श्री. प्रभाकर येवले आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘निवृत्त झाल्यानंतर आपले घरातील महत्त्व कमी होत आहे, या भावनेने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ होतात.
त्यांच्यात बरेचदा एकाकीपणाची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीतही ज्येष्ठांना आनंदी जीवन कसे जगता येईल, याचा विचार आम्ही केला आणि त्यानंतर प्रतिष्ठानाची स्थापना केली. आतापर्यंत ५० हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक शेगावसह इतर धार्मिक स्थळांवर तीर्थपर्यंटन करून आले आहेत. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. क्रीडा महोत्सवात ५ हजारांहून अधिक ज्येष्ठांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ नागरिक सतत कुठल्या ना कुठल्या उपक्रमात गुंतून राहिले तर त्यांच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत आणि त्यांना जीवनाचा आनंदही घेता येईल.’ सूत्रसंचालन डॉ. राखी खेडीकर यांनी तर प्रास्ताविक डॉ. मंगला गावंडे यांनी केले दीपक शेंडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधुरी पाखमोडे, कालिंदिनी ढुमणे, वंदना वारके, गोविंद पटेल, मिलिंद वाचणेकर, विजय बावनकर, श्रीधर नहाते यांनी परीश्रम घेतले.