नागपूर समाचार : शिक्षण क्षेत्रावर होणारा खर्च ही भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणुक आहे. त्यामुळे तरुणांना प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) तरुणांना केले.
मिहान येथील सिटी प्रमियर कॉलेजमध्ये आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार श्री. अजय संचेती, श्री. मोहन गंधे, श्री. मुकुंद देशपांडे, भाजप नेते श्री. संजय भेंडे, श्री. जयप्रकाश गुप्ता, श्री. जयंत खळतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील तरुणांनी मतदार नोंदणीच्या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल ना. श्री. गडकरी यांनी अभिनंदन केले. आपले एक मत देशाच्या भविष्याची दिशा निश्चित करणारे असते. त्यामुळे तरुणांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे येऊन इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहनही ना. श्री. गडकरी यांनी केले. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘मतदान करणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. त्यामुळेच आपण आपला अधिकार बजावून योग्य व्यक्तीला निवडून देण्याचे काम करीत असतो.’ ‘नागपूर व विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मिहान सुरू करण्यात आले. जगातील पाच मोठ्या आयटी कंपन्या आज मिहानमध्ये आहेत. त्यामुळे व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास तरुणांना रोजगाराचे दालन खुले होईल.’