इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनतर्फे होळी मिलन
नागपूर समाचार : छोट्या-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांना नागपूर शहरात उत्तम सुविधा मिळाव्यात, त्यांचा व्यापार वाढीस लागावा आणि शहराच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान राहावे, यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो आणि पुढेही राहणार, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) दिला.
दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने मस्कासाथ येथे आयोजित होळी मिलन कार्यक्रमात ना. श्री. नितीन गडकरी सहभागी झाले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक रमेश मंत्री, असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘अतिशय दाटीवाटीच्या अश्या इतवारी व महाल भागात वाहतुकीची कोंडी होते. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ग्राहकांचीही गैरसोय होते. या सर्व परिस्थितीची मला जाणीव आहे. नव्या सुसज्ज अशा मार्केटमुळे ही समस्या सुटणार आहे. मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेल हा रस्ता चारपदरी होणार असून यादरम्यान ६ मार्केट्स असणार आहेत. याठिकाणी व्यापाऱ्यांना सर्व सुविधा मिळणार आहेत.
वाहतुकीची कोंडीही संपुष्टात येईल.’ दोन वर्षांनंतर होळी मिलनाचा कार्यक्रम नवीन ठिकाणी आपण आयोजित करू शकू, असा मला विश्वास आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, भाजप नेते संजय भेंडे, श्रीमती आभा पांडे, श्री. जयप्रकाश गुप्ता यांची श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.