नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी आज (रविवार) नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित ‘होळी मिलन’ कार्यक्रमात सहभागी झाले. सिव्हिल लाइन्स येथील पत्रकार क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये शहरातील व्यापारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष हेमंत गांधी, डॉ. दीपेन अग्रवाल, कैलासचंद्र अग्रवाल, दिलीप दोशी, जयप्रकाश गुप्ता, संजय बंगाले, गिरीश व्यास आदी मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर ना. श्री. गडकरी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ना. श्री. गडकरी यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येत असल्याचे सांगितले.
‘इतवारीसारख्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ग्राहकांचीही गैरसोय होते. याठिकाणी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. यातून मार्ग काढण्यासाठी बाजारपेठांना इतर ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करून देण्यात येणार आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर व्यवसाय वाढीला लागेल आणि ग्राहकांची देखील सोय होईल,’ असे ना. श्री. गडकरी म्हणाले.