शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग
नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) विविध कार्यक्रमांमध्ये नागपुरातील तरुणांशी संवाद साधला. शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित ‘सौर होळी मिलन’ तसेच राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने आयोजित ‘मित्रों के बीच’ या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले.
साई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. संजय भेंडे, श्री. गिरधारी मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. सभागृहात आयोजित तरुणांना ना. श्री. गडकरी यांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येण्याचे तसेच इतरांना प्रेरित करण्याचे आवाहन केले. नागपूरच्या विकासामध्ये सोयी सुविधा निर्माण करण्यासोबतच तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. ‘गेल्या दहा वर्षांमध्ये १ लाख कोटींची कामे नागपूरमध्ये झालीत. येत्या काळात नागपूर हे एज्युकेशन हब, एव्हिएशन हब आणि लॉजिस्टिक हब म्हणून नावारुपाला येईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने राष्ट्रभाषा भवन येथे आयोजित ‘मित्रों के बीच’ या कार्यक्रमाला परिवारचे अध्यक्ष राजाराम शुक्ला, श्री. सुरेश अग्रवाल, श्री. गंगाप्रसाद ग्वालबंशी, सूर्यमणी भिवगडे, चंपा शर्मा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमात विविध संघटनांनी ना. श्री. नितीन गडकरी यांचे स्वागत केले. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांची विविध क्षेत्रातील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मानवी संबंध ही राजकारणातील सर्वांत मोठे भांडवल असते. आणीबाणीच्या वेळी काम केले तेव्हा बाबुजी अग्रवाल सोबत होते. तेव्हापासून ही मैत्री कायम आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
‘गेल्या दहा वर्षांपासून मी या क्षेत्राचा खासदार आहे. या भागासाठी १ लाख कोटींची कामे केली. पण कोरोना काळाने खरी परीक्षा घेतली. रेमिडेसिवीर मिळत नव्हते, अॉक्सीजन मिळत नव्हते, रुग्णालयात खाटा मिळत नव्हत्या. या काळात शंभर कोटींचे साहित्य रुग्णालयांना वितरित केले. केवळ नागपुरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात मदत केली.
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरित केले,’ असे ना. श्री. गडकरी म्हणाले. माझ्यादृष्टीने समाजकारण आणि सेवाकारण हेच खरे राजकारण आहे. त्यामुळे मदत करताना जात-पात बघत नाही, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी कमाई आहे. मला खूप चांगले मित्र भेटले. त्यांना कधीही विसरलो नाही, अशी भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.