नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) शहरातील चार्टर्ड अकाऊंटंट व इतर व्यावसायिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून झालेल्या कामांची व आर्थिक नियोजनाची उदाहरणे सांगितली.
गांधीसागर येथील रजवाडा पॅलेस येथे सीए, सीएमए आणि सीएस मंडळींचे स्नेहमिलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. जयदीप शहा, श्री. दिलीप रोडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘समाजात चार्टर्ड अकाउंटंटचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तुमच्यासारख्या मंडळींचे प्रेम आणि समर्थन मिळत आहे, याबद्दल कृतज्ञ आहे,’ अशा भावना ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला व्यक्त केल्या.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘१९९५ ते २००० या कालावधीत मी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो. मला मुंबईतील घरासाठी टीव्ही घ्यायचा होता. मलबार हीलला एका दुकानात मी टीव्ही खरेदी करण्यासाठी गेलो. तिथे मला एक प्रश्न पडला. जर टीव्ही आणि कार इन्स्टॉलमेंट्सवर मिळू शकतात, तर टनेल्स, रस्ते, उड्डाणपूल इन्स्टॉलमेंट्सवर का तयार होऊ शकत नाहीत? त्यानंतर आणि आता गेल्या नऊ वर्षांमध्ये हजारो कोटींची कामे पीपीपी, बीओटी यासारख्या विविध माध्यमांतून पूर्ण झाली आहेत आणि आजही सुरू आहेत. विशेष म्हणजे त्यामुळेच संपूर्ण देशात महामार्गांचे जाळे विणता आले.’
‘कचऱ्यापासून ट्रान्सपोर्टपर्यंत इकॉनॉमिक व्हायबलिटीचे अनेक प्रकल्प होऊ शकतात. इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच नाही तर इतर क्षेत्रातही योग्य नियोजन केले तर उत्तम फायनान्शीअल मॉडेल अमलात आणता येते. त्यातून ग्रोथ रेट वाढविणे शक्य आहे. अनेक प्रकल्पांतून चांगले उत्पन्न देखील मिळू शकते, पण त्यासाठी बीओटीचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. सार्वजनिक खासगी गुंतवणुकीतून देखील बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.