केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे आतषबाजीने स्वागत
नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे पूर्व नागपुरात आतषबाजीने आणि पुष्पवर्षाव करून जोरदार स्वागत झाले. तरुणाईच्या आणि महिलांच्या उदंड प्रतिसादाने आजची लोकसंवाद यात्रा गाजली.
झाडे भवन (छापरूनगर चौक) येथून ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रशांत पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी नगरसेवक चेतना टांक आदींची उपस्थिती होती. पूर्व नागपूरच्या नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी लोकसंवाद यात्रेसाठी आधीपासून जय्यत तयारी केली होती. अनेक वस्त्यांमध्ये, चौकांमध्ये मोठे होर्डिंग्स, बॅनर्स लावण्यात आले होते. एका वस्तीमध्ये मुस्लीम बांधवांनी ना. श्री. गडकरी यांच्या स्वागतासाठी खास स्टेज उभारला होता. तर श्रीकृष्ण नगर येथे ‘हम विश्वास दिलाते हैं… जो राम को लाए हैं… हम उनको लाएंगे’ असे शब्द असलेले मोठे फलक शितला माता देवस्थान पंचकमेटीने लावले होते. अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती.
लोकसंवाद यात्रा आपल्या घरासमोरून जाणार म्हणून स्वागताची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यात महेंद्र राऊत यांनी यात्रेचे उत्तम संचालन करून रंगत आणली. सकाळी नऊच्या सुमारास छापरूनगर चौकातून निघालेली यात्रा कुंभार टोली, शास्त्री नगर, जयभीम चौक, व्यंकटेश नगर, दर्शन कॉलनी, गायत्री कॉन्व्हेंट, प्रियदर्शनी कॉलेज, हसनबाग, न्यू सहकार नगर, रमणा मारोती, भवन्स शाळा, प्रज्ञाशील बुद्ध विहार, शिवशक्ती चौक, गुप्ता पॅलेस, चांदमारी मंदिर या मार्गाने गोरा कुंभार समाज भवन येथे यात्रेचा समारोप झाला.
सिम्बायोसिससाठी कृतज्ञता
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे पूर्व नागपूरमध्ये वाठोडा परिसरात सिम्बायोसिससारखी प्रतिष्ठित शिक्षण संस्था उभारण्यात आली, याबद्दल स्थानिक नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त करणारे फलक उंचावले होते. ‘सिम्बायोसिस व दिव्यांग पार्कसाठी ना. श्री. नितीन गडकरी यांचे खूप खूप आभार’ असे फलक उंचावलेले तरुण अनेक वस्त्यांमध्ये उभे होते.