- उद्या भाजपच्या स्थापना दिनी नागपूरात हजारो कार्यकर्ते करणार बूथ प्रवेश
- बूथ स्तरावर काँग्रेस होणार आणखी कमजोर:बावणकुळेंचा दावा
- गडकरी,फडणवीस यांचा ही असणार तीन तास बूथवर मुक्काम
- गुढीपाडवा,महात्मा ज्योतिबा फूले जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी भाजप करणार उत्साहात साजरा
नागपूर,ता.५ एप्रिल २०२४ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज विविध वृत्तपत्रांमध्ये भाजप विरोधात ‘वॉशिंग मशीन’ची जाहीरात प्रसिद्ध झाली असून ‘जुमला’चा उल्लेख त्यात केला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यात काँग्रेसच्या या जाहीरातीकडे त्यांचे लक्ष वेधले असता,काँग्रेस ‘हवेत उडणारा पक्ष ’असल्याचा टोला त्यांनी हाणला.दररोज बहूसंख्य काँग्रेसी हे काँग्रेसचा त्याग करीत असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईत संजय निरुपम यांनी पक्ष सोडला,जळगावचे उल्लास पाटील यांनी पक्ष सोडला,माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या स्नृषा यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल,काँग्रेसमध्ये असंतोष असल्याचे विधान बावणकुळे यांनी केले.
काँग्रेसचे सर्वेसर्वा राहूल गांधींकडे आपल्याच पक्षाच्या नेत्यांसाठी वेळ नाही.राज्यातले नेतृत्व ही दुभंगलेले दिसून पडते.अशोक चव्हाण सारखे कट्टर काँग्रेसी नेत्याने पक्ष सोडला.पुढच्या काही काळात काँग्रेस पक्ष हा आणखी कमकुवत झालेला दिसून पडेल,असे भाकीत याप्रसंगी बावणकुळे यांनी वर्तवले.आज राज्यस्तरावर कमकुवत झालेली काँग्रेस पक्ष उद्या, बुथ स्तरावर कमजोर होणार असल्याचा दावा त्यांनी केला.उद्या शनिवार दिनांक ६ एप्रिल हा दिवस भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस असून भाजप बूथस्तरावर फार मोठा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरात ३ लाख ९२५ सुपर वॉरियर्स हे बूथ सांभाळणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बुथ क्रमांक ५ व ६, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य नागपुरातील बुथ क्र. २१९ व २२० तर बावनकुळे स्वत: कामठी विधानसभा क्षेत्रातील २८ व २९ क्रमांकाच्या बुथवर झेंडावंदन व त्यानंतर पक्ष प्रवेश कार्यक्रमात सहभागी होतील,अशी माहिती त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पुढ्यात आलेला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री हे राज्यभरातील ९७,३२५ बुथवर साजरा करणार आहेत. बूथ मजबुतीसोबत बूथ अंतर्गत येणाऱ्या सर्व मतदारांशी यानिमित्ताने संपर्क व संवाद करता येईल. तीन तास हे सर्वजण स्थापना दिन यापद्धतीने साजरा करणार आहेत.
राज्यातील ३३ हजार ३६९ सुपर वॉरियर्स झेंडा वंदन आणि याचवेळी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली.
राज्यभरात मंडळ व बुथ स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार असून बाईक रॅली काढली जाणार आहे. भाजपाचे ३२ लाख कार्यकर्ते लोकसभा निवडणूक काम करणार असून, प्रत्येक बुथवर ५१ टक्के मते महायुतीला मिळवून देण्यासाठी पूर्णवेळ काम करत आहेत.
याप्रसंगी बोलताना बावणकुळे यांनी सांगितले,की येत्या ९ एप्रिल रोजी रामनवमी आहे,११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फूले यांची जयंती आहे,१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे तर १७ एप्रिल रोजी रामनवमी आहे.हा प्रत्येक उत्सव भाजपचे बूथ कार्यकर्ते उत्साहात साजरा करणार आहे.९ एप्रिल रोजी प्रत्येक बूथवर भाजपच्या महिला नेत्या ‘विकासाची गुढी‘उभारणार आहेत.फूले जयंती रोजी प्रत्येक बूथवर भाजपचे कार्यकर्ते ‘टिफिन’बैठक घेतील.महात्मा फूलेंना अभिवादन करुन आपापल्या घरुन आणलेले डबे खाऊन बूथवर बैठक भरवतील व मतदार यादीचं वाचन करतील.१४ एप्रिल रोजी प्रत्येक गावात,प्रत्येक प्रभागात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाईल.
हे सर्व उपक्रम पंतप्रधान मोदींची‘विकसित भारत’ची संकल्पना पूर्ण करण्यासाठी या निवडणूकीत ५१ टक्के मत प्रत्येक बूथवर भाजपला कसे मिळेल यासाठी कार्य करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात ३२ लक्ष कार्यकर्ते यासाठी काम करीत आहेत.भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदींची संकल्पना सांगत आहे.महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा युतीच्या निवडूण आनणार असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.या निवडणूकीत जनतेकडून महायुतीला निश्चितच समर्थन मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यासाठी ३३ हजार ३०० नेते, ८५ आमदार, मतदार संघातील बूथवर तीन तास उद्या आपला वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांचे बूथ प्रवेश होणार आहेत त्यात कोणता मोठा चेहरा आहे का?असा प्रश्न केला असता मोदींच्या विकसित भारत संकल्पनेवर असंख्य कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याने भाजपमध्ये येण्याची त्यांची ईच्छा असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मतदारसंघात ऐनवेळी आपला उमेदवार बलदला,याकडे लक्ष वेधले असता,त्यांना तो अधिकार असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.भाजपने देखील केंद्रिय मंडळाकडून स्वीकृत झालेली उमेदवारांची यादी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या माहितीसाठी दिली आहे.राज्यात ४५ पेक्षा जास्त जाग जिंकण्याचे महायुतीचे ध्येय असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.
मोदींंच्या ‘विकसित भारत ‘संकल्पनेवर ज्यांचा पण विश्वास आहे ते भाजपमध्ये त्यांचे स्वागत आहे.विचारधारा बदलत असते पण ती पक्की पाहिजे असे ते म्हणाले.भाजप काही सन्यासी पक्ष नाही,पक्षाचा विस्तार करण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.संजय निरुपम हे भाजपमध्ये येत आहेत कर?या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपसोबत कोणताही संपर्क केला नसल्याचे उत्तर बावणकुळे यांनी दिले.
काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात गॅस सिलेंडरचे दर पुन्हा ४५० रुपये करणार असल्याकडे लक्ष वेधले असता,कर्नाटकमध्येही काँग्रेसने असेच आश्वासन जनतेला प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते.वीज नि:शुल्क देऊ,पाणी नि:शुल्क देऊ,मात्र मत घेण्यासाठी काँग्रेसने खोटे प्रतिज्ञापत्र दिले,अजून ही त्या आश्वासनांची अंमलबजावणी काँग्रेस पक्ष कनार्टकमध्ये करु शकला नाही,असा आरोप त्यांनी केला.
सारंग गडकरी यांनी नुकतेच गडकरी यांचा प्रचार करताना टेका येथील मुस्लिम बांधवांसमोर २०१४ मध्ये नागपूर ही भाजपची सीट नव्हती,आज ही भाजपची सीट नाही,भाजपकडे नव्हे तर गडकरी यांच्याकडे बघून मत देण्याचे आवाहन सारंग गडकरी यांनी केले,यावर बाावणकुळे यांना प्रश्न विचारला असता,ते त्यांचे व्यक्तिगत मत होतं,असे उत्तर बावणकुळे यांनी दिले.प्रत्येकला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.गडकरी यांनी भाजपची संघटना वाढवण्यासाठी कष्ट घेतले आहे,संघटना त्यांनी मोठी केली.ते कोणत्याही जाती,धर्माशी जुळले नाही.आज नागपूरात भाजपची उंची त्यांनी वाढवली आहे हे नाकारता येत नाही,त्यामुळे काही अशी विधाने झाली असेल तरी तो त्यांचा व्यक्तिगत विचार असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.