ना. गडकरी यांच्यासह लोकसंवाद यात्रेत सहभाग
नागपूर समाचार : श्री नितीन गडकरी यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे भारतातील पायाभूत सुविधांची जगभर चर्चा होत आहे. अशा लोकप्रिय आणि आदर्श नेत्याला निवडून देण्याची खात्री नागपूरच्या जनतेने आधीच दिली आहे. त्यामुळे नितीनजी विजयाचे सगळे विक्रम मोडीत काढतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.
केंद्र रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज दक्षिण पश्चिम मतदारसंघात दाखल झाली. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. दीपक सावंत, आमदार रामदास आंबटकर, खासदार कृपाल तुमाने, नाना श्यामकुळे, प्रशांत पवार, संजय भेंडे, संदीप जोशी, संदीप गवई आदींची उपस्थिती होती. सहकार नगर पुराणिक चौक येथून लोकसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर गजानन धाम, श्यामनगर वस्ती, स्वागत सोसायटी, सोनेगाव तलाव रोड, एचबी इस्टेट, समर्थ नगरी, सोनेगाव वस्ती, शिव विहार कॉलनी मेन रोड, त्रिशरण बुद्ध विहार एकात्मता नगर, जयताळा गणेश मंदिर, रमाबाई आंबेडकर नगर, जयताळा मुख्य चौक, गाडगे नगर, रेणुका माता मंदिर, जुना हिंगणा नाका, वासुदेव नगर या मार्गाने हिंगणा रोड टी-पॉईंट येथे लोकसंवाद यात्रेचा समारोप झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘पूर्वी भारतात दिवसाला 12 किलोमीटर रस्ते व्हायचे. आता नितीनजी यांच्या नेतृत्त्वात दिवसाला 38 किलोमीटरचे रस्ते होतात. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गडकरी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले आणि अनेक प्रकल्प सुरू आहेत, याचा अभिमान आहे. त्यांच्याकडे प्रगतीची गंगा आणण्याचे व्हिजन आहे.’
‘नितीनजी बाळासाहेबांचे आवडते मंत्री होते’
‘नितीनजी हे बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते मंत्री होते. नितीनजींनी मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे बांधला तेव्हा बाळासाहेब त्यांना रोडकरी म्हणाले होते. मुंबईमध्ये 55 पूल बांधले तेव्हा बाळासाहेब त्यांना पूलकरी म्हणायला लागले.’
‘नागपूरकर जनतेचा माझ्यावर विश्वास – ना. श्री. गडकरी’
दहा वर्षे नागपूरची सेवा करतोय. 1 लाख कोटींची कामे शहरात केली. पण यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे नागपूरच्या जनतेने माझ्यावर केलेले प्रेम आणि लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे. त्यामुळे मी जे काही करू शकलो त्याचे श्रेय नागपूरच्या जनतेला आहे, अशा भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे लोकसंवाद यात्रेत सहभागी झाल्याबद्दल ना. श्री. गडकरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.