पूर्व नागपुरातील पारडी येथे जाहीर सभेचे आयोजन
नागपूर समाचार : ‘गरिबाला जात नसते. मानवतेच्या नजरेने मी प्रत्येकाकडे बघतो. त्यामुळेच मी समाजसेवेचे राजकारण करतो. वैद्यकीय मदत करताना जात-धर्म बघत नाही. गरिबांचे कल्याण हेच माझे राजकारणातील पहिले ध्येय आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) केले.
पारडी येथील हनुमान मंदिर चौकात आयोजित केलेल्या जाहीरसभेत ना. श्री. नितीन गडकरी बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेना नेते सूरज गोजे, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रमोद पेंडके, ईश्वर बाळबुधे, दीपक वाडीभस्मे, चेतना टांक, वैशाली वैद्य यांची उपस्थिती होती.
‘पूर्व नागपुरातील भवानी माता हॉस्पिटलमध्ये 1700 निःशुल्क हार्ट ऑपरेशन करून दिले, याचे खूप समाधान आहे. या हॉस्पिटलला मी आतापर्यंत 20 कोटींची मदत केली. ही मदत गरिबांच्या उपचारासाठी कामात येत आहे. आतापर्यंत 40 ते 45 हजार लोकांच्या हार्ट ऑपरेशन्ससाठी मदत केली. 350 दिव्यांग मुलांना कृत्रिम पाय लावून दिले. 1 लाख लोकांचे डोळे तपासले, 25 हजार लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून दिले. कोरोना काळात 100 कोटींचे साहित्य वितरित केले. आता वाठोडा येथेही 300 खाटांच्या 187 कोटींच्या वीर सावरकर हॉस्पिटलचे कामही सुरू झाले आहे,’ याचाही ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. पारडीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगले रस्ते आणि उड्डाणपूल झाले. या भागातील चित्र पूर्णपणे बदलले. एक मोठे मार्केट इथे होणार आहे. त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना सर्व सुविधा मिळतील. 600 गाड्यांचे पार्किंग असेल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘जिथे कचरा टाकला जायचा, त्या भांडेवाडीमध्ये सिम्बायोसिस सारखी संस्था आली. आता नरसी मोनजी नावाची संस्था 40 एकरामध्ये होणार आहे. पूर्व नागपुरातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची सोय होणार आहे.’
‘काँग्रेसवाले संभ्रम निर्माण करत आहेत’
‘काँग्रेसला लोकांचे मन वळवणे कठीण झाले आहे त्यामुळे ते खोटा प्रचार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. ते म्हणतात भाजप संविधान बदलणार आहे. पण, आरोप करणारे डब्ब्यात जमा झाले आहेत. त्यांची नावे घेऊन मला त्यांना महत्त्व देखील द्यायचे नाही. कारण आज त्यांचीच माणसे मला विजयासाठी शुभेच्छा देत आहेत,’ अशी कोटीही ना. श्री. गडकरी यांनी केली.