नागपूर समाचार : अकाली पावसामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर मात करीत उत्तर नागपुरातील नागरिकांनी उत्साह दाखवून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दणदणीत स्वागत केले आणि यात्रा यशस्वी केली.
बुधवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे लोकसंवाद यात्रेबद्दल काहीशी अनिश्चितता होती. मात्र, नागरिकांच्या उत्साहावर पावसाचा काहीही परिणाम झाला नाही आणि भर पावसात गडकरींची लोकसंवाद यात्रा उत्तर नागपुरात दाखल झाली. नागरिकांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला.
सकाळी दहाच्या सुमारास टेका नाका येथील बाबा बुद्धाजी नगरमध्ये ना. श्री. गडकरी दाखल झाले. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार गिरीश व्यास, वीरेंद्र कुकरेजा आदींची उपस्थिती होती. गुरुद्वारा श्री तेग बहादूर साहिब येथे दर्शन घेऊन नितीनजींनी यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थ नगर, नई बस्ती या मार्गाने फारुख नगर व महेंद्र नगर येथे यात्रा पोहोचली. याठिकाणी ना. श्री. नितीन गडकरी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जागोजागी नागरिकांकडून पुष्पवर्षाव करण्यात आला. सर्व वस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक ना. श्री. गडकरी यांना भेटण्यासाठी उत्साहाने पुढे आले. प्रचार रथाचे स्वागत करतानाच ना. श्री. गडकरी यांना निवडणुकीतील दमदार विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
यशोदीप कॉलनी, मोहम्मद रफी चौक, यादव नगर, जयभीम चौक, राणी दुर्गावती चौक, पंचशील नगर, वैशाली नगर सिमेंट रोड, जय श्रीराम चौक, शाहू मोहोल्ला, वनदेवी नगर, लाल झेंडा चौक, यशोधरा चौक, टिपू सुल्तान चौक, संघर्ष नगर, रिंग रोड, एकता कॉलनी या मार्गाने ऑटोमोटिव्ह चौकाजवळ यात्रेचा समारोप झाला.