- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मुस्लिम समाजाला काँग्रेसने उपेक्षित ठेवले – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची टीका

मोमीनपुरा येथे जाहीर सभेचे आयोजन

नागपूर समाचार :- मुस्लीम समाजाला काँग्रेसच्या कार्यकाळात काय मिळाले? चहाची टपरी, पानठेला, ड्रायव्हर तयार करण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसने मुस्लिम समाजाला उपेक्षित ठेवले, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केली.

मोमीनपुरा येथे ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मुस्लिम समाजाला प्रगती करायची असेल तर समाजात शिक्षणाचा प्रसार करावा लागेल. त्यासाठी नवीन पिढीमध्ये जनजागृती करावी लागेल, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘माझे कॉलेज, शाळा नाही. अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि काँग्रेसवाल्यांची रोजगार हमी, असे चित्र आहे. मला माझ्या कोट्यातून इंजिनियरिंग कॉलेज मिळाले होते, तर ते मी अंजूमन शिक्षण संस्थेला दिले. तिथे मुस्लिम समाजातील हजारो तरुण इंजिनियर झाले आणि आजही शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तुम्ही ज्ञान प्राप्त करा, प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतील. ताजबाग येथे चारशे खाटांचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. तिथे गरिबांना उपचार मिळतील आणि मुस्लीम समाजातील तरुणांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणाही मिळेल.’ पूर्वी मुस्लीम व दलित समाजातील बहुतांश लोक सायकल रिक्षा चालवायचे. मला ते फार अन्यायकारक वाटायचे. मी २०१४ मध्ये मंत्री झालो तेव्हा १ कोटी लोक रिक्षा चालवायचे, ५० लाख लोक पाठीवर पोते घेऊन जायचे. हे शोषणाचे प्रतिक होते. ई-रिक्षाच्या माध्यमातून त्यांच्या वेदना दूर करण्याचे भाग्य मला लाभले. आज देशात सायकल रिक्षा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. देशातील दीड कोटी लोकांना मानवी शोषणातून मुक्त केले, हीच माझी कमाई आहे, याचा ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला.

काही लोक माझ्याकडे आले आणि मोमीनपुऱ्याचा रस्ता चारपदरी करण्याची मागणी केली. या भागातील रस्ते निमुळते आहेत. आग लागली तर अग्नीशमनची यंत्रणा पोहोचू शकत नाही, रुग्णवाहिका येऊ शकत नाही. मात्र आता लवकरच इथला उड्डाणपूल पूर्ण होईल. सोबतच आता मेयो हॉस्पिटल ते लकडगंज पर्यंत चारपदरी रस्ता होत आहे. त्यात पाच मोठे मार्केट्स तयार होणार आहेत. तिथे छोट्या-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांना जागा मिळेल. पार्किंगची उत्तम व्यवस्था असेल, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.  

तुम्ही चिंता करू नका. जो मला मत देईल त्याचे काम करेन आणि मत न देणाऱ्याचेही काम करेन. दहा वर्षांत जात-पात-धर्म न बघता सेवा केली. ४५ हजार हार्ट अॉपरेशन्स केले. हजारो दिव्यांगांना कृत्रिम अवयवय व इतर मदत केली, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *