अभिनेते खासदार मनोज तिवारी यांची उपस्थिती
नागपूर समाचार :- ‘आपल्याला कामाच्या भरवशावर निवडून येणे शक्य नाही, हे माहिती असल्याने काँग्रेसवाले जातीचे कारण देऊन मत मागत आहेत. मतांसाठी जातीय वातावरण तयार केले जात असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे. मी जातीचे राजकारण कधीही केले नाही. लोकांची सेवा करण्यावर भर दिला आणि प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे निवडणुकीत जातीवर नाही, कामावरच मोहोर लागेल,’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.
पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान चौक येथे ना. श्री. नितीन गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध अभिनेते खासदार मनोज तिवारी, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, माजी उपमहापौर संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘काँग्रेसच्या नेत्यांना गरीब कुटुंबातील मुलांना रोजगार कसा मिळेल याची चिंता नाही. त्यांना आपल्या मुलांच्या रोजगाराची चिंता आहे. आम्ही राजकारणाचा उद्योग केला नाही आणि हे लोकांना माहिती आहे. कारण ये पब्लिक है सब जानती है.’
नागपुरात सगळीकडे काँक्रिट रस्ते होत आहेत. चोवीस तास पाण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. नागपुरातील तरुणांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. नागपूर आता एज्युकेशन हब म्हणून नावारुपाला येत आहे. आज मिहानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आल्या आहेत. याठिकाणी आयटी क्षेत्रातील हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे. नागपूरला पर्यटन हब म्हणून विकसित करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे मार्ग खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
नितीनजी माझे ज्येष्ठ बंधू – मनोज तिवारी
खासदार मनोज तिवारी यांनी आपल्या खास शैलीत भाषण देऊन उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी ना. श्री. नितीन गडकरी यांना ‘ज्येष्ठ बंधू’ असा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नितीनजी माझे ज्येष्ठ बंधू आहेत. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नितीनजींच्याच माध्यमातून झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी इथे बोलण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो. नागपूरकर जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार याचा मला पूर्ण विश्वास आहे.’